• Mon. Nov 25th, 2024

    ‘शासन आपल्या दारी’ अभियानामुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ

    ByMH LIVE NEWS

    Sep 5, 2023
    ‘शासन आपल्या दारी’ अभियानामुळे साडेबावीस लाख लाभार्थ्यांना लाभ

    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १५ एप्रिल २०२३ पासून सुरू झालेल्या या अभियानातून प्रत्येक जिल्ह्यातून किमान ७५ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. तथापि, पुणे जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय अशी कामगिरी केली असून सुमारे २२ लाख ६१ हजार लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ आणि सेवांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे वितरित केलेल्या लाभांची किंमत सुमारे ३ हजार कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

    सर्वसामान्य नागरिक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, निराधार व्यक्ती यांची शासन स्तरावरील कामे स्थानिक पातळीवरच मार्गी लागावीत, त्यांना विविध योजनांचे देय लाभ मिळावेत, त्यांना शासकीय कार्यालयात एकाच कामासाठी वारंवार चकरा घालाव्या लागू नये हा या अभियानामागचा उद्देश आहे. त्याअंतर्गत पुणे जिल्ह्यात महसूल मंडळ स्तरावर, तालुकास्तरावर या अभियानांतर्गत मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले. जेजुरी (ता. पुरंदर) येथे भव्य जिल्हास्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.

    या अभियानाच्या माध्यमातून शासन थेट जनतेच्या दारी पोहोचले आहे. शेवटच्या गरजू व्यक्तीपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यास व कमीत कमी कागदपत्रे, जलद मंजुरी व शासकीय निर्धारित शुल्कात नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास हे अभियान उपयुक्त ठरले आहे. या उपक्रमाच्या पूर्वतयारीअंतर्गत १५ एप्रिल ते १५ मे या कालावधीत नागरिकांना विविध विभागांच्या योजनांची माहिती देणे, प्रस्तावित लाभार्थ्यांची यादी तयार करणे तसेच त्यांच्याकडून अर्ज भरुन घेण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानुसार पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणात गतीने कार्यवाही करत लाभ वितरणारी कार्यवाही करण्यात आली.

    या अभियानाच्या माध्यमातून ३८५ विविध प्रकारचे लाभ वितरित करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, अधिवास, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र यासह विविध प्रकारचे दाखले, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, नावांची वगळणी, नवीन शिधापत्रिका तयार करणे आदी कामकाज, जात प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, शेतकरी असल्याचा दाखला, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पोस्टामध्ये खाते उघडणे, पशुधन लसीकरण, आधार क्रमांक जोडणी व अद्ययावत करणे, आरोग्य तपासणी आदी लाभ प्रत्यक्ष देण्यात आले.

    महाडीबीटी नोंद, फळबाग नोंद, बि- बियाणे मागणी अर्ज, शेती किट, फवारणी किट, बाजार किट, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, पशुसंवर्धन विभागांतर्गत गायी, म्हशी, शेळी व मेंढी वाटप, परिवहन विभागांतर्गत शिकाऊ चालक अनुज्ञप्ती, सामाहिज न्याय व दिव्यांग कल्याण विभागांतर्गत दिव्यांग साहित्य वाटप, निवडणूक विषयक कामकाजाअंतर्गत नवमतदार नोंदणी, स्वयंरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन, आयुष्मान कार्ड वितरण, प्रधानमंत्री आवास योजना तसेच विविध घरकुल योजनांच्या लाभांचे वितरण, महामंडळांच्या कर्ज योजना व अन्य योजनांचे लाभ या अभियानात नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले.

    स्वामित्व योजना, कृषी यांत्रिकीकरण, जि. प. कृषी विभागातर्फे अवजार खरेदीसाठी अनुदान, स्वयंसहायता समूहाला अनुदान, स्व. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प, सौर पंप, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, अनुसूचित जमातीच्या नागरिकांना पर्यटन विकासासाठी अनुदान, जि. प.तर्फे महिलांना अर्थसहाय्य, अशा विविध योजनांचाही लाभ देण्यात आला.

    या अभियानात २२ लाख ६१ हजार ७८७ लाभार्थ्यांना २ हजार ९९९ कोटी ९३ लाख रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागांतर्गत २५ हजार २८० लाभार्थ्यांना, महिला व बालकल्याण विभाग ५१४ लाभार्थी, कृषी विभाग १ हजार ९५० लाभार्थी, ग्रामपंचायत विभाग २ हजार २१३ लाभार्थी, प्राथमिक शिक्षण विभाग ७ लाख १० हजार ११२ लाभार्थी, घरकुल योजनेचा ३ हजार ६६५ लाभार्थ्यांना याप्रकारे ठळक लाभ वितरित करण्यात आले.

    जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत १६ हजार १२१ लाभार्थी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने ६ हजार ५३९ लाभार्थी, संजय गांधी योजनेचा ९८ हजार ४० लाभार्थ्यांना, महसूल विभागाच्या विविध योजनांचा ४ लाख ६२ हजार ९८६ लाभार्थ्यांना, निवडणूक विभाग ६४ हजार ३६२ लाभार्थी, नगरपालिकेकडील लाभ २३ हजार ७६३ लाभार्थ्यांना देण्यात आले आहेत.

    राज्य शासनाच्या कृषी विभागाकडील योजनांचा ४ लाख ८ हजार ६९८ लाभार्थ्यांना, कामगार आयुक्त १० हजार १७ लाभार्थी, अग्रणी बँक कार्यालयाच्यामार्फत विविध सेवांचा २ लाख ५१ हजार ४१० लाभार्थी, सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा ६ हजार ९७४ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. याशिवाय पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनेही या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली असून अनुक्रमे २९ हजार २२० आणि ७५ हजार १७० लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ दिले आहेत.

    महारोजगार मेळाव्यात ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी निवड

    ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने जेजुरी येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळाव्यात नोंदणी केलेल्या १ हजार २९ उमेदवारांपैकी ६३९ उमेदवारांची रोजगारासाठी जागीच निवड करण्यात आली.

    शासकीय योजनांच्या लाभासाठी नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये येणे, योजनांची माहिती घेणे, योजनेसाठी आवश्यक असलेले दस्तऐवज विविध कार्यालयात जाऊन जमा करणे, जमा केलेले कागदपत्र पुन्हा सादर करण्यासाठी कार्यालयाकडे येणे अशा विविध प्रक्रियेतून जावे लागते. अशा क्लिष्ट प्रक्रियेतून जाताना सर्वसामान्य नागरिकांची दमछाक होत असते. नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी अभियान राबविण्यात आले. त्याचे अत्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.

    जेजुरी येथे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते शासकीय योजना व विविध सेवांच्या लाभाचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद अभियानाचे यश सांगणारा होता.

    -सचिन गाढवे, माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed