• Wed. Mar 18th, 2026
    Pune Crime : अल्पवयीन मतीमंद मुलीवर नातेवाईकांकडूनच अत्याचार, उच्चभ्रू सोसायटीतील संतापजनक प्रकार, नराधमांना अटक

    पुण्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन मतिमंद मुलीवर तिच्याच तीन नातेवाईकांनी गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून शहरात संताप व्यक्त होत आहे.

    पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन मतिमंद मुलीवर नातेवाईकांकडून अत्याचार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात नात्यांना काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका सुरक्षित समजल्या जाणाऱ्या उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या अल्पवयीन आणि मतिमंद मुलीवर तिच्याच तीन नातेवाईकांनी गेल्या सहा-सात महिन्यांपासून सामूहिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

    विश्वासाचा घात

    मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी अल्पवयीन असून तिची मानसिक स्थिती सामान्य नाही. या गोष्टीचा फायदा घेत तिच्याच जवळच्या नात्यातील तीन व्यक्तींनी तिला आपल्या जाळ्यात ओढले. घराशेजारीच राहणारे आणि ओळखीचे असल्याने या नराधमांना मुलीच्या घरात येण्या-जाण्यास कोणाचीही आडकाठी नव्हती. मात्र, याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपींनी सोसायटीच्या क्लब हाऊसच्या स्वच्छतागृहात आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केला.

    पीडितेने मांडली आपबिती

    गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा अघोरी प्रकार सुरू होता. सततच्या अत्याचारामुळे पीडित मुलीच्या स्वभावात आणि वागण्यात अचानक बदल झाला होता. ती भेदरलेल्या अवस्थेत राहू लागल्याने कुटुंबीयांच्या मनात शंका आली. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, तिने आपल्यासोबत घडलेला सर्व धक्कादायक प्रकार सांगितला. ज्या नातेवाईकांना कुटुंब आपले समजत होते, त्यांनीच मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचे समोर येताच पालकांच्या पायाखालची जमीन सरकली.

    Maharashtra TimesBeed Crime : जुना वाद, निपाणी तांड्यावर दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; वृद्ध शेतकरी, गरोदर महिलेलाही बेदम मारहाण

    पोलिसांकडून तात्काळ कारवाई

    मुलीने आपबिती सांगताच कुटुंबीयांनी विलंब न करता भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवली आणि तिन्ही नराधम नातेवाईकांना ताब्यात घेतले. आरोपींवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    ही घटना उघडकीस आल्यानंतर समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वतःच्या घरात आणि नातेवाईकांकडेही जर मुली सुरक्षित नसतील, तर विश्वास कोणावर ठेवायचा? असा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा