स्वीकृत सदस्य प्रक्रियेत अशोक चव्हाणांनी भाजपच्या निष्ठावंताला कात्रजचा घाट दाखवला आहे. भाजपच्या या निष्ठावंत नेत्याने संधी मिळणार म्हणून बँड बाजासह मिरवणुकीची तयारी केली होती. पण अशोक चव्हाणांनी ऐनवेळी आपल्या समर्थकाला संधी दिली.
महापालिका निवडणुकीत भाजपने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात पहिल्यांदा निवडणूक लढविली होती. तब्बल 81 पैकी 45 उमेदवार जिंकून भाजपने पहिल्यांदा महापालिकेवर सत्ता काबीज केली. महापौर कविता मुळे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेदरम्यान भाजपचे पाच, काँग्रेस एक, वंचित एक आणि एमआयएम पक्षाचे एक अशा आठ स्वीकृत सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, भाजपने शेवटपर्यंत पाच स्वीकृत सदस्यांचे नाव गोपनीय ठेवले होते. मात्र भाजपचे निष्ठावंत अशी ओळख असलेल्या दिलीप ठाकूर यांचं सुरुवातीपासून नाव चर्चेत होतं. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका कार्यक्रमात दिलीप ठाकूर यांना मोठी जबाबदारी देणार असं आश्वासित देखील केले होते. शिवाय निवड प्रक्रियेच्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्यांना यादीत नाव आहे, असं भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून सांगण्यात आले. पण ऐनवेळी माजी नगरसेवक अमितसिंह तेहरा यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
अमितसिंह तेहरा हे अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. ते 2017 मध्ये काँग्रेसकडून नगरसेवक पदी निवडून आले होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाल्यानंतर अमितसिंह तेहरा यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश केला होता.
दुसरीकडे स्वीकृत सदस्यांच्या यादीतून डावलण्यात आल्याने दिलीप ठाकूर हे नाराज झाल्याचे पहायला मिळाले. त्यांनी स्वतःच्या जल्लोषासाठी बँड मागवले होते. शिवाय शुभेच्छाचे बॅनर तयार केले होते. निष्ठावंताला डावलण्यात आल्याने चर्चेचा विषय बनला होता. विशेष म्हणजे दिलीप ठाकूर यांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारी दाखल केली होती. मात्र चव्हाण यांच्या आश्वासनानंतर त्यांनी उमेदवारी मागे घेतली. एवढचं नाही तर घरदार सोडून त्यांनी प्रचार सुरु झाल्यापासून ते मतमोजणी होईपर्यंत प्रचार कार्यालयात तळ ठोकून पक्षाचे काम केले होते. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही त्यांनी पक्षाचे काम केले. पण शेवटपर्यंत पक्षाने त्यांना झूलवत ठेवले. दरम्यान आपल्याला संधी न मिळाल्याने भाजपमधील निष्ठावंतांमध्ये नाराजी देखील पाहायला मिळाली.
समर्थकांच्या निवडीसाठी मंत्री अतुल सावे यांनी लावली ताकद
नांदेड महानगर पालिकेच्या स्वीकृत सदस्यांच्या निवडी वरून मोठी घडामोड पहायला मिळाली. भाजपने दिलीप कंदकुर्ते, डॉ अंकुश देवसरकर, अमितसिंह तेहरा, आशुतोष जोशी आणि सुप्रिया पाटील यांना संधी दिली. स्वीकृत सदस्य पदासाठी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी पक्षश्रेष्ठींकडे ताकद लावली होती. त्यातच पालकमंत्री अतुल सावे यांनी देखील आशुतोष जोशी यांच्यासाठी फिल्डिंग लावली होती. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जोशी यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.
आशुतोष जोशी हे पालकमंत्री अतुल सावे यांचे समर्थक मानले जातात. समर्थकला संधी मिळावी यासाठी मंत्री सावे हे आग्रही होते अशी चर्चा आहे. दुसरीकडे माजी आमदार राम पाटील रातोळीकर हे देखील स्नुषा सुप्रिया पाटील यांना स्वीकृत सदस्य पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
