पुनर्विकासाच्या नावाखाली काम अर्धवट सोडून बिल्डर परागंदा झालेल्या पाच हजार सोसायट्या मुंबईत आहेत. या सोसायट्यांचे काम रखडल्याने वाताहत झालेल्या कुटुंबांची संख्या १.२९ लाख आहे. तर ७९० सोसायट्यांनी स्वयंपुनर्विकासाचा ठराव केला आहे. पण सरकार दरबारी शासन निर्णयाची अमलबजावणी होत नसल्याने या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे काम थांबले आहे. मात्र २५ हजार सोसायट्यांना तातडीने पुनर्विकासाची गरज असल्याचे ज्येष्ठ वास्तुविशारद व या क्षेत्रातील तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना स्पष्ट केले. या संकटाला ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वृत्तमालिकेद्वारे वाचा फोडली.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनचे सचिव रमेश प्रभू यांच्याशी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, ‘कधी विकासक, कधी बिल्डर, कधी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार तर कधी सोसायट्यांची समिती, यांच्याकडूनच पुनर्विकास किंवा स्वयंपुनर्विकास साधणाऱ्या सोसायटींची फसवणूक झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे आता असोसिएशन अंतर्गत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार, सुयोग्य प्रकारे पुनर्विकास करू शकरणारे विकासक व बिल्डर यांचे पॅनल तयार केले जाईल. या सर्वांना सोसायट्यांशी संलग्न केले जाईल, तसेच या पॅनलच्या माध्यमातून पुनर्विकास साधण्यासाठी अटी व नियमही निश्चित केले जाईल. पुनर्विकास किंवा स्वयंपुनर्विकासात वित्त साहाय्याची सर्वात मोठी अडचण असते. त्यासाठी कर्ज, वित्त साहाय्य देणाऱ्या बँकांचे पॅनलही तयार केले जाईल. पुढील दोन ते तीन महिन्यांत याला मूर्त रूप दिले जाईल.’
४० हजार सोसायट्या
मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ४० हजार गृहनिर्माण सहकारी सोसायट्या आहेत. त्यापैकी ३० हजार सोसायट्या या महासंघाशी संलग्नित आहेत. तर मुंबई उपनगर जिल्हा को-ऑप सोसायटीज महासंघही असोसिएशनशी संलग्न आहे.