मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संबोधनानंतर अजित पवार यांनी उपसमितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळी त्यांना बारामतीच्या आंदोलनावर प्रश्न विचारला असता त्यांनी आक्रमकपणाने उत्तर दिलं.
अजित पवार म्हणाले, बारामतीत आंदोलन झालं म्हणून माध्यमांनी त्या आंदोलनाची जास्त दखल घेतली. सरकारमधून बाहेर पडा, अशा घोषणाबाजी झाल्याचं माझ्या वाचनात आलं. त्यानंतर मी काटेवाडीच्या सरपंचांना फोन करून तेथील घटनेची माहिती घेतली. त्यावेळी अशी घोषणा देणारे आपल्या गावातील नव्हते, ते बाहेरचे होते, अशी माहिती मला सरपंचांनी दिली. तो कोण होता, कुठला होता माहिती नाही. उद्या कुणीही उठून काहीही मागणी करेल, याला काय अर्थ आहे. तो निदान सरपंच-उपसरपंच तरी असायला हवा होता… असं अजित पवार म्हणाले.
बारामतीत आंदोलक आक्रमक, पवारांवर निशाणा
बारामती देशाला दिशा देते, असं बोललं जातं.. मग तुम्हाला आरक्षण का मिळत नाही.. असा सवाल करत थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरतीच बारामतीत निघालेल्या मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर लाठीमार केल्यानंतर अवघा महाराष्ट्र पेटून उठला आहे. आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली असून बारामतीमध्येही मराठा बांधव आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
मंत्रालयावर मराठा बांधवांचा मोर्चा नेण्याची तयारी सुरू करा, मग यांना कळेल, मराठा समाज काय आहे.. आजवर महिला शांत होत्या.. आता महिलांनी बांगड्या घेऊन आमदार खासदारांना भरा त्याशिवाय आमदार खासदारांना त्यांची लायकी कळणार नाही, अशा प्रकारची आक्रमक भाषणे आंदोलनावेळी झाली.