दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार कल्याणमध्ये घडला होता. त्यावेळी कारागिराने लाखो रुपयांचे दागिने लांबविले होते. त्याला नंतर राजस्थानमधून अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बसंतीलाल चपलोत (६६) यांच्या मालकीचे डोंबिवली रेल्वे समांतर असलेल्या नेहरु रोडला प्रगती ज्वेलर्स नावाने दुकान आहे. या दुकानात विक्रम गोपाळ रावल (२८) हा गेल्या काही वर्षांपासून विश्वासाने काम करतो. विक्रम विश्वासू असल्याने दुकानमालक बसंतीलाल यांनी गुरुवारी संध्याकाळी त्याच्याकडे दुकानातील १२ लाख ७२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हॉलमार्क करण्यासाठी दिले. हे दागिने त्याने इच्छितस्थळी नेणे मालकाला अपेक्षित होते.
नोकर विक्रम हा गुरुवारी संध्याकाळी दुकानातून सोन्याचा ऐवज घेऊन बाहेर पडला. सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला आहे का? याची खात्री करण्यासाठी मालक बसंतीलाल यांनी विक्रमशी संपर्क साधला. मात्र तेथे तो पोहोचला नसल्याचे कळल्यावर मालकांनी हॉलमार्क केंद्राशी संपर्क साधला. तेथेही तो गेला नसल्याचे सांगण्यात आले. या प्रकारामुळे अस्वस्थ झालेल्या बसंतीलाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विक्रमची परिसरात शोधाशोध केली असता तो कुठेही आढळून आला नाही. तर त्याचा मोबाईल देखील बंद असल्याचे आढळून आले. विक्रमने विश्वासघात करुन सोन्याचा ऐवज लांबविला असल्याची खात्री पटल्यानंतर मालक बसंतीलाल यांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन फरार विक्रमच्या विरुध्द तक्रार दाखल केली.
डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक अजिंक्य धोंडे, हवा. निलेश पाटील, विशाल वाघ, निसार पिंजारी, नितीन सांगळे असे तपास पथक रहस्यमयरित्या गायब झालेल्या विक्रमच्या मागावर होते. या पथकाने चपलोत यांच्या दुकान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. शहरातील सर्व रस्त्यांवर पोलिसांनी एकाच वेळी तपास सुरू केला. त्यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे विक्रम ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना पाहताच विक्रमने धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत त्याची फर्लांगभर अंतरावर त्याची गठडी वळली.
त्याच्याकडून ९ लाखांच्या सोन्याच्या बांगड्या, दोन सोन्याच्या चेन असा १२ लाख ७२ हजारांचा लांबविलेला सर्व ऐवज जप्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या तीन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली. विक्रम हा शहीद भगतसिंग रोडला असलेल्या एका सोसायटीत राहतो. विक्रमच्या डोक्यावर पन्नास हजार रुपये कर्ज होते. त्यातच त्याच्याजवळ मालकांनी लाखो रुपयांचे दागिने दिल्याने त्याची नियत फिरली. त्यासाठी त्याने हा चोरीचा मार्ग पत्करला.