मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या १० ते १५ वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करतायेत. मनोज तसे मूळचे बीडच्या मातोरीचे…पण काही वर्षांपूर्वी ते जालन्याच्या अंबडमधील अंकुशनगरात स्थायिक झाले. जरांगे पाटलांच्या घरची परिस्थिती बेताचीच. पण समाजसेवेची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नाही. अगदी स्वत:च्या मालकीची जमीन विकून त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं. यासाठी त्यांनी कित्येक मोर्चे काढले, आमरण उपोषणे केली, रास्ता रोको केले…
आर्थिक परिस्थिती बेताची
मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे. पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असं मनोज यांचं कुटुंब आहे.
सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम, नंतर शिवबा संघटनेची स्थापना
मनोज यांनी सुरूवातीला काँग्रेस पक्षात काम केलं. पण पुढे त्यांनी काँग्रेसशी फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापन केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरूवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता.
आंदोलनं करणे हा मनोज यांचा स्थायीभाव
आंदोलने करणे हा मनोज यांचा स्थायीभाव… २०२१ मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल तीन महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय सहा दिवस उपोषणही केलं. गोरीगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली.
मनोज जरांगे २०११ पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत. त्यांच्या नेतृत्वात २०१४ मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी ३५ हून अधिक मोर्चे, आंदोलने केली.
दरम्यान, समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी शनिवारी अगदी सकाळी संभाजीराजे जातीने उपस्थित राहिले. खुद्द छत्रपती आल्याचं पाहून जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत ‘रडायचं नाही-आता लढायचं’ असा निर्धार बोलून दाखवला. तेव्हा जरांगे यांनीही डोळे पुसत राजेंच्या हातात हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही, असा एल्गार केला.