मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय तरूण आणि २१ वर्षीय तरुणी हे मध्य प्रदेशातील बालाघाट शहरातील मूळ रहिवासी आहेत. दोघेही दहावीपासूनच एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनाही लग्न करायचे होते. मात्र, उमेश बेरोजगार असल्याने तरूणीच्या आई-वडिलांनी तरुणाशी लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे तरूण कामाच्या शोधात नागपुरात आला. नागपुरात एका मोठ्या हॉटेलमध्ये नोकरी करू लागला. वर्षभरानंतर तो घरी आला, तेव्हा तरूणीच्या घरच्यांनी तिचे लग्न तरुणाच्या काकाशी ठरवले होते. दोघांचा साखरपुडा झाला होता. तरूण आणि तरुणी समोर आले असता दोघेही गोंधळले. मात्र, कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून तरुणाने माघार घेतली.
आपली प्रेयसी काकाची बायको म्हणून नांदायला कुटुंबात आली. मात्र, लग्नानंतर दोघांनी आपले प्रेमसंबंध सुरूच ठेवले. काका आणि त्यांचा कुटुंबियांना याची माहिती नव्हती. दरम्यान, तरुणीने दोन मुलांना जन्म दिला. सर्व काही सुरळीत सुरू होते. कोरोनाच्या नंतर काका आणि तरूण दोघेही नागपुरातील हॉटेलमध्ये कामाला आले. पारडीत एक घर भाड्याने घेऊन काका, काकू आणि पुतण्या (तरूण ) सोबत राहू लागले. तरुणी (काकु) आणि तरूण दोघेही एकमेकांच्या प्रेमात परत बुडाले आणि प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी चिठ्ठी लिहून घरातून पळ काढला. ते पाहून काकाच्या पायाखालची जमीनच सरकली. आपल्या मुलांचा विचार न करता पत्नी पळून गेल्याने तो चिंतेत होता. पत्नी मुलांसाठी तरी परत येईल या आशेने संजय आठ दिवस थांबला. यानंतर त्यांनी भरोसा सेलमध्ये तक्रार केली.
पतीच्या (काका) तक्रारीवरून भरोसाच्या पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी दोन्ही पळून गेलेल्यांचे ठिकाण शोधून काढले. त्यांना भरोसा कक्षात आणण्यात आले. दोन्ही मुलांना घेऊन काका तेथे पोहोचला. समोरासमोर बसून तिघांचा सल्ला घेण्यात आला. यानंतर तिघांचेही समुपदेशन करण्यात आले. एकमेकांच्या मनातील संभ्रम दूर झाला. तरुणाची समजूत कढण्यात आली. तरुणीला दोन्ही मुलांचा विचार करण्याची संधी मिळाली. दोघेही चुकीचे होते. तरुणाने त्यानंतर थेट गाव गाठायचे ठरवले तेव्हा काका-काकूंचा संसार बहरला.