जालना जिल्ह्यातील अंबड येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. जालना औरंगाबाद रोडवर नागेवाडी व दावलवाडी या दोन ठिकाणी मराठा युवक आक्रमक झाले असून रस्त्यावर टायर जाळून रस्ता रोको केलेला आहे. दोन्ही रस्त्यांवरील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने जालन्यातील लाठीचार्जच्या निषेधार्थ उद्या बीड बंदची हाक दिली आहे. तसंच सोलापुरात, मराठा समाजाने सरकारमधील प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलं आहे. सोलापुरात सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातील मुख्य चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने जालना येथील मराठा आरक्षणासाठी बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करून मोठी चूक केली आहे, याचे परिणाम राज्य सरकारला भोगावे लागतील, असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.
दरम्यान, सकल मराठा समाजाचे समनव्यक माऊली पवार यांनी याप्रकरणी बोलताना म्हटले की, ‘मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मराठा समाज आंदोलन करत राहणार. यापुढे एकाही मराठा कार्यकर्त्याच्या केसाला देखील धक्का लागला तर, महाराष्ट्र पेटून उठेल,’ असा इशारा दिला आहे.