यंदा काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतील गणेशमूर्ती २५ फुटांहून अधिक उंच आहेत. शनिवारी दहाहून अधिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती गणेशशाळेतून मंडपाकडे नेण्यात येणार आहेत. तसेच रविवार, ३ सप्टेंबर रोजी तब्बल तीसहून अधिक गणेशमूर्ती कार्यशाळेतून बाहेर पडणार आहेत. हा आगमन सोहळा पाहण्यासाठी मुंबई आणि उपनगरांतून हजारो गणेशभक्त लालबाग-परळमध्ये दाखल होतील असा अंदाज आहे. गणेशमूर्ती घेऊन जात असताना मंडळाच्या कार्यकर्त्यांना भक्तांच्या प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. त्याबरोबरच विभागातील स्थानिक नागरिकांनाही वाहतूककोंडीचा त्रास होतो. नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी गणेशोत्सव मंडळे खबरदारी घेत आहेत. ‘ताडदेवचा राजा’ मंडळाचा कार्यकारी अध्यक्ष सिद्धेश माणगावकरने त्यांच्या मंडळाकडून केल्या जाणाऱ्या नियोजनाची माहिती दिली.
‘ताडदेवचा राजा’चा आगमन सोहळा रविवार, ३ सप्टेंबर रोजी ढोल-ताशांच्या गजरात होणार असून श्रींची मूर्ती मूर्तिकार रेश्मा विजय खातू यांनी साकारली आहे. हा आगमन सोहळा भायखळा बकरीअड्डा येथून दुपारी १ वाजता सुरू होणार आहे. रात्रौ १० वाजण्याच्या अगोदर गणेशमूर्ती मंडपात दाखल होईल. आगमन मार्गावर मंडळाचे तब्बल तीनशे कार्यकर्ते आळीपाळीने पोलिसांना सुरक्षिततेसाठी सहकार्य करतील. तसेच मार्गात कार्यकर्त्यांकडून कचरा होणार नाही; याची खबरदारी आम्ही घेणार आहोत. गणेशमूर्ती आणि वादक यांच्याभोवती मानवी साखळी असेल’, असे त्याने सांगितले.
गैरसोय टाळण्यासाठी सूचना
शनिवार, रविवारपासून मंडळांच्या मंडपात गणपतीबाप्पांचे आगमन होत आहे. या आगमन सोहळ्यांचा वाहतूक यंत्रणेवर परिणाम होऊ नये, यासाठी या दिवशी दोन्ही दिशेने जाणारी वाहने लालबागचा राजा सिग्नलपासून आयटीसी हॉटेलपर्यंत एकच, अशोका टॉवरच्या बाजूने चालविण्यात यावीत व श्रॉफ बिल्डिंग ते तेजुकाया, भारतमाता, परळ वर्कशॉप हा मार्ग फक्त गणेशमूर्तीच्या आगमनासाठी रिकामी ठेवण्यात यावा, एकाच मार्गिकेवर गर्दी आणि वाहतूककोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, भायखळा येथून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून बस अथवा अवजड वाहनांना प्रवासासाठी परवानगी देऊ नये, त्यांची वाहतूक रे रोड, कॉटनग्रीन, चार रस्ता मार्गे वळविण्यात यावे, तसेच रेडिओ, माध्यमे, एक्सच्या माध्यमातून लोकांना याची माहिती देण्यात यावी, बांधकामाच्या वाहनांना सकाळी ९ ते सायंकाळी ८ पर्यंत परवानगी देऊ नये अशा अनेक सूचना समितीने पोलिसांना केल्या आहेत.
गणेशोत्सव समन्वय समितीने हे आगमन सोहळे लक्षात घेऊन पोलिस आणि वाहतूक पोलिसांना काही सूचना केल्या आहेत. खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते समतोल करण्यात यावे, भायखळ्यापासून सुरू होणाऱ्या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशा विविध प्रकारच्या सूचना गणेशोत्सव समन्वय समितीने केल्या आहेत.
अॅड. नरेश दहिबावकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती