ऑगस्टमध्ये सर्वसाधारणपणे पावसाचे प्रमाण कमी असते. मात्र यंदा राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी असल्याचा परिणाम एकूण तापमानावर झाला आहे. राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा सातत्याने अधिक होते. या उकाड्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. वाढलेले तापमान, वातावरणातील आर्द्रता यामुळे सध्या ऑगस्ट संपतानाच ऑक्टोबर हिटचा अनुभव मुंबईकरांना येत आहे.
ऑगस्टमधील सर्वसाधारणपणे ३०.२ अंश सेल्सिअस कमाल तापमान असते तर २५.२ अंश सेल्सिअस किमान तापमान असते. ऑगस्टमध्ये बहुतांश वेळा कमाल तापमानाचा पारा ३१ ते ३२ अंशांदरम्यान होता. मात्र वाढलेल्या आर्द्रतेमुळे हे तापमान प्रत्यक्ष तापमानापेक्षा अधिक जाणवत होते. प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या शक्यतेनुसार, ३ सप्टेंबरपर्यंत कमाल तापमानाचा पारा ३२ अंशांपर्यंत कायम राहील. पावसाळ्यात नैऋत्य किंवा पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे दिलासा मिळतो. पण ऑगस्टमध्ये पावसाळी वारे नसल्याने हा दिलासा मिळाला नाही.
वाढत्या तापमानाचा अंदाज
मुंबई उपनगरांमध्ये ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली तर मुंबई शहरात ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या ७९ टक्के तूट नोंदली गेली. क्वचितच आलेल्या पावसाने तात्पुरता थोडा गारवा जाणवला. त्यानंतर पुन्हा चढ्या तापमानाची जाणीव मुंबईकरांना झाली. वातावरण बदलामुळे तीव्र हवामानाचे अनुभव येतील, असा अंदाज वर्तवला जात असल्याने यंदाचा ऑगस्ट महिना हा अशाच प्रभावाचा अनुभव होता का, असा प्रश्न मुंबईकर विचारत आहेत.
आरोग्यावर परिणाम
सकाळच्या वेळीही किमान तापमान चढे असल्याने उकाड्याचा अनुभव घेत मुंबईकर कार्यालयांमध्ये पोहोचले. बाहेरचा उकाडा आणि त्यानंतर कार्यालयांमधील एसी या टोकाच्या वातावरणाचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे.
पुन्हा पाऊस
गुरुवारी पुढील चार आठवड्यांसाठीचा अंदाज जाहीर झाला असून या अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या मध्यापासून सप्टेंबरच्या मध्यापर्यंत दक्षिण द्विपकल्प, महाराष्ट्र, गोवा इथे पावसाच्या पुनरुज्जीवनाची शक्यता आहे. राज्यात मराठवाडा आणि कोकण येथे पावसाची चिन्हे आहेत. या पावसामुळे वातावरण पुन्हा गार होऊन तापमानवाढीच्या त्रासापासून दिलासा मिळेल, अशी शक्यता आहे.