ही घटना अकोला जिल्ह्यात घडली. याचिकाकर्त्यानुसार, त्याच्याच जिल्ह्यातील एका मुलीसोबत त्याने रीतसर प्रेमविवाह केला. मात्र, मुलीच्या घरच्यांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यांनी दोघांना त्रास देणे सुरू केले. एक दिवस त्यांनी याचिकाकर्त्याला मारहाण केली व तिच्या पत्नीला अर्थात आपल्या मुलीला ते आपल्यासोबत घेऊन गेले. त्यांनी मुलीला घरात डांबून ठेवले. याचिकाकर्त्याने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली. पोलिस आयुक्तांकडेही दाद मागितली.
मात्र, कुणीच लक्ष न दिल्याने अखेर त्याने त्याचे वकील मतीन देशमुख आणि धीरज कनवाले यांच्यामार्फत उच्च न्यायालयात ‘हिबीअस कॉर्पस’अंतर्गत याचिका दाखल केली. त्यावर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी आणि वाल्मिकी मेन्जेझ यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने या तरुणीला न्यायालयात बोलावून घेतले. तिचे मत जाणून घेतले असता, आपण याचिकाकर्त्यासोबत लग्न केले असून आपल्याला त्याच्यासोबत राहायचे असल्याचे तिने न्यायालयाला सांगितले. यावर न्यायालयाने ‘ती सज्ञान असून तिचा जोडीदार तिला निवडण्याचा अधिकार आहे’, असे स्पष्ट केले.
भेदरलेली होती तरुणी…
ही तरुणी तिचे वडील व माहेरच्यांना चांगलीच घाबरलेली होती. ती न्यायालयात हजर झाली त्यावेळी तिच्या माहेरची मंडळीगी न्यायालयात उपस्थित होते. ती मोकळेपणाने बोलण्यास संकोचत असल्याचे न्यायालयाच्या लक्षात आले. त्यामुळे न्यायालयाने एका महिला वकिलाला तिच्याशी एकट्यात संवाद साधण्यास सांगितले. ‘मी स्वखुशीने याचिकाकर्त्यासोबत लग्न केले असून, मला त्याच्यासोबत राहायचे आहे’, असे तरुणीने महिला वकिलाला सांगितले.