निर्यातशुल्क लागू केल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना कांद्याच्या दरांसाठी रस्त्यावरही उतरावे लागले. ही परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोच गुरुवारी हा प्रकार घडल्याने कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली संतापाची धग कायम असल्याचे अधोरेखित झाले. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी गुरुवारी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीस आणला. जिल्ह्यात सध्या ‘नाफेड’ची ४० कांदा खरेदी केंद्रे आहेत, तर ‘एनसीसीएफ’ची २० खरेदी केंद्रे आहेत. जिल्ह्यातील या ६० खरेदी केंद्रांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे कांद्याची खरेदी सुरू आहे. ‘नाफेड’ने दिलेल्या वायद्यानुसार दोन लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. या कांद्याला ‘नाफेड’ने दोन हजार ४१० रुपये दर देऊ केलेला आहे.
कंपनी प्रतिनिधींना विचारला जाब
लासलगाव बाजार समितीत गुरुवारी सकाळी तास ते दोन तास लिलाव सुरळीत पार पडल्यानंतर अचानक दिल्लीतून आलेल्या ई-मेलमधील सूचनेनुसार कांद्याच्या दरात कपात करण्यात आली. दोन हजार ४१० रुपयांऐवजी दोन हजार २७४ रुपये प्रतिक्विंटल दर घोषित करण्यात आल्यानंतर शेतकरी नाराज झाले. दोन हजार ४१० रुपये दरानुसार काही शेतकऱ्यांनी आपला माल कंपनीस दिलाही होता. मात्र, हाती पैसे मिळताना कमी दराने मिळण्याचे चित्र पाहून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कंपन्यांच्या प्रतिनिधींना जाब विचारला. अनेक जण विक्रीसाठी आणलेला कांदा घेऊन माघारी परतले.
दुपारनंतर नवीन आदेश
कांद्याच्या दरकपातीमुळे लासलगाव बाजार समितीतील शेतकरी आक्रमक झाले होते. कंपनी प्रतिनिधींनी ही परिस्थिती मुख्य कार्यालयास कळविली. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याही कानावर हा प्रकार गेला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नाफेड’च्या केंद्रातील अधिकाऱ्यांशी संवाद साधत आढावा घेतला. ग्राहक मंत्रालयाशीही संवाद साधत स्थानिक परिस्थितीची कल्पना त्यांनी दिली. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान पुन्हा नवीन आदेश काढण्यात आले. नवीन आदेशांनुसार पुन्हा काद्यास दोन हजार ४१० रुपये प्रतिक्विंटल दर लागू करण्यात आला. पुढील आदेश येईपर्यंत हा दर स्थिर ठेवण्यात येणार असल्याचे नव्या आदेशात म्हटले आहे.