• Sat. Sep 21st, 2024

माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे; नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला कोळी बांधवांचे साकडे

माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे; नारळी पौर्णिमेनिमित्त दर्याराजाला कोळी बांधवांचे साकडे

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पालघर जिल्ह्याला लाभलेल्या वसई ते झाई-बोर्डी अशा ११० किमी लांबीच्या किनाऱ्यावर बुधवारी नारळी पौर्णिमेचा उत्साह ओसंडून वाहत होता. गावागावांत सोनेरी नारळ समुद्राला अर्पण करण्यात आले. ‘माझ्या बोटीला भरपूर मासळी गावू दे’ अशी प्रार्थना करत कोळी बांधवांनी दर्या राजाचे मनोभावे पूजन केले. पारंपरिक वेषभूषेत, बँड आणि बेंजोच्या तालावर नाचत-गात मच्छिमार नारळी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाले. ‘सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा… मनी आनंद मावंना कोल्यांच्या दुनियेचा…. आरं बेगीन, बेगीन चला किनारी जाऊ देवांच्या पूजेला, हात जोडूनी नारळ सोन्याचा देऊया दर्याला,’ यांसह विविध पारंपरिक गाण्यांवर मच्छिमारांनी ताल धरला.

मासेमारीबंदीच्या कालावधीत किनाऱ्यावर शाकारलेल्या बोटी समुद्रात उतरवण्यासाठी बोटींची डागडुजी, रंगरंगोटी, नवीन जाळी भरणे, इंजिन दुरुस्ती आदी कामे आटोपून मच्छिमारांनी १ ऑगस्टपासून मासेमारी व्यवसायाला सुरुवात केली आहे. नारळी पौर्णिमेचा सण साजरा करण्यासाठी मनाजोगी लुगडी, दागिने, हातातला चुडा आदींची जमवाजमव, खरेदी केल्यानंतर, बेंजो, सोन्याचा नारळ आदी तयारी तरुण-तरुणींनी केली. त्यासाठी कोळीगीतांवर नृत्ये बसवणे, सराव आदी जोरदार तयारी केली होती.

विदेश म्हात्रे नृत्यपथक, भाट पाडा नृत्यपथक यांनी गावातून वाजतगाजत मिरवणूक दांडापाड्यावरील किनाऱ्यावर पोहोचली. तेथे विविध नृत्याविष्कार पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. सातपाटी सण उत्सव समितीद्वारे नृत्यकला सादर करणाऱ्या मंडळांना सन्मानचिन्ह देण्यात आले.
पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था अपुरीच; उपचारांसाठी मुंबई, गुजरातला रुग्णांची धाव
सातपाटीमधील भाटपाडा गणेशोत्सव मंडळ, मुरबे, नवापूर, उच्छेळी आदी भागात नारळी पौर्णिमा साजरी करण्यात आली. जिल्ह्याच्या पूर्व भागातील मनोर, चारोटी, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या भागात मासेविक्री व अन्य व्यवसायांनिमित्त राहणाऱ्या मच्छिमारांनीही नदीनाल्यांमध्ये नारळ अर्पण केला आणि समुद्रात मासेमारीला जाणाऱ्या बोटींना भरपूर मासे मिळू देत, वादळवाऱ्यात त्यांचे संरक्षण होऊ दे, अशी प्रार्थना दर्याराजाला केली. पारंपरिक पेहरावात अनेक मंडळे उत्साहात नारळी पौर्णिमेच्या उत्सवात सहभागी झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed