लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले साहित्य परिसरातील नागरिकांना आढळून आले या प्रकाराने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी असलेल्या एका लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावण्यात आला होता. या बरोबरच अरबी भाषेत एका चिठ्ठीमध्ये मंत्र लिहिलेले होता. असे साहित्य परिसरातील नागरिकांना आढळून आले. त्यामुळे हा अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार उजेडात आला. या संपूर्ण प्रकाराची माहिती नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीपुढे मांडली आहे. या प्रकाराची तक्रार पाहता अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना माहिती दिली.
हा सर्व प्रकार जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन असून संबंधित अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा, अशी लेखी तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समितीने येवला शहर पोलिसांकडे केली आहे. या प्रकरणाच्या चौकशीला पोलिसांनी सुरुवात केली असून पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहेत. तरुणीच्या फोटोसह अरबी भाषेत मंत्र लिहिलेली चिट्ठी सापडल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत असून एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे उदय कुऱ्हाडे, आयुब शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते. हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. नेमकं हा प्रकार कशासाठी चालू होता आणि कोणी घडवला असा देखील प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासात काय निष्पन्न होतं ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.