म. टा. वृत्तसेवा, मंचर : ‘माझ्यासाठी मंत्रिपद महत्त्वाचे नाही. तुमच्या प्रेमामुळे मला गेली ३३ वर्षे विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, हे सर्व शरद पवार यांच्यामुळेच घडले. आंबेगाव तालुक्यात अनेक प्रकल्प येण्यासाठी पवारच कारणीभूत आहेत. आम्ही अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहोत. शिवसेना वा भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही. शरद पवार माझ्या आणि आपल्या हृदयातच आहेत. मी त्यांना कधीही अंतर देणार नाही आणि त्यांच्याबद्दल वाकडा शब्दही बोलणार नाही,’ अशी भावना सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
लाखनगाव (ता. आंबेगाव) येथे सुमारे ३६ कोटी साठ लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन वळसे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे होते. भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे शिवाजीराव ढोबळे आदी या वेळी उपस्थित होते.

‘आपल्या परिसराचे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. डिंभे धरणातून बोगदा करून माणिकडोह धरणात पाणी नेले जाणार आहे. हे जर घडले, तर डिंभे धरण तीन महिन्यांत रिकामे होणार आहे. जुन्नर, आंबेगाव आणि शिरूरमधील ६५ बंधारे धरणाच्या पाण्यातून भरले जायचे. मात्र, यापुढे सर्व बंधाऱ्यांत धरणातून पाणी सोडायचे नाही, असा चुकीचा निर्णय सरकारमध्ये होऊ पाहत आहे. असे घडले, तर तालुक्यात पुन्हा ७२च्या दुष्काळासारखी स्थिती निर्माण होईल. त्यासाठी आपणाला प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असे वळसे पाटील म्हणाले.