रांजणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये आमदार प्रशांत बंब, जिल्हा परिषद सदस्य उषा हिवराळे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, अशोक धनावत, संजय खंबावत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जनता दरबाराच्या सुरुवातीलाच नागरिकांनी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे याबाबत प्रश्न विचारले. अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली. तसेच ड्रेनेज लाईन,घरकुल,रेशन कार्ड, अंतर्गत रस्त्यांची व दिव्यांग लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात यावा अशा तक्रारी करत समस्या सोडवण्याची मागणी केली.
माजी उपसरपंच आणि आमदार आपसात भिडले
माजी उपसरपंचाने ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आक्रमक भूमिका घेतली. यावेळी दोघांनी एकमेकांना अनेक प्रतिप्रश्न केले. आमदारांनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही, असा आरोप करत माजी उपसरपंच आक्रमक झाले. तुम्ही केवळ सकारात्मक बोलता, पण नकारात्मक कामं करता, अशी आक्रमक पवित्रा माजी उपसरपंच दुबिले यांनी घेतला.
जोगेश्वरीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दुबिले यांनी गेल्या पंधरा वर्षात तुम्ही तालुक्यात दिलेल्या एकही आश्वासन पूर्ण केले नाही असा जाब आमदारांना विचारला. यावेळदोघांमध्ये चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. चिडलेल्या आमदार बंब यांनी उपसरपंचांनाच त्यांच्या कारकीर्दीवरून डिवचलं. उपसरपंच दुबिले यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे सांगावीत, असं आव्हानच आमदार बंब यांनी दिलं.
तू आधी खोटं बोलला की नाही, तू आधी माझं ऐकून घे…. तू असं करू नकोस… तुला जे बोलायचं ते नंतर बैठक घेऊन बोल. मी यांचं ऐकून घेतलं आहे. मी १५ तारखेच्या आत नागरिकांशी बोलतो, असा युक्तिवाद करून आमदार बंब उपसरपंचांना शांत करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र ते काही ऐकायला तयार नव्हते. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या, असं म्हणत आमदारांना कोंडित पकडलं होतं.