• Sun. Sep 22nd, 2024

PMP बस अपघात रोखण्यासाठी त्रिसूत्री; अपघातस्थळांचा अभ्यास करुन करणार उपाययोजना

PMP बस अपघात रोखण्यासाठी त्रिसूत्री; अपघातस्थळांचा अभ्यास करुन करणार उपाययोजना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : ‘पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसचे अपघात रोखण्यासाठी त्रिसुत्रीचा अवलंब करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये अपघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास करून त्या ठिकाणी उपाययोजना करणे, चालकांचे प्रशिक्षण व प्रबोधन आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई अशा मुद्द्यांवर काम केले जात आहे,’ अशी माहिती पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

पीएमपीच्या बसचे अपघात वाढत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदा अपघातांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यात ऑगस्ट महिन्यातदेखील अनेक अपघात झाले आहेत. अपघात होणाऱ्या बसमध्ये ठेकेदारांच्या बसची संख्या जास्त आहे. त्यामुळे पीएमपी प्रशासनाने अपघात रोखण्यासाठी काम सुरू केले आहे. त्या संदर्भात सर्व विभाग व डेपोंना सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघातांचा केला अभ्यास

पीएमपीकडून अपघात झालेल्या ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला आहे. दोन किंवा त्यापेक्षा जास्त अपघात झालेल्या ठिकाणांची माहिती काढण्यात आली आहे. पीएमपीच्या विविध मार्गांवर अशा प्रकारचे २० ते २५ ठिकाणे आढळून आली आहेत. त्या ठिकाणी महापालिकेच्या मदतीने उपाययोजना करण्यात येणार असून, नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी आवश्यक सूचना देणारे फलक लावण्यात येणार आहेत.

चालकांना मार्गदर्शन व प्रशिक्षण

पीएमपी प्रशासनाने अपघात कमी करण्यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यासोबतच त्यांचे प्रबोधन करण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामध्ये पीएमपीचे निवृत्त अधिकारी आणि २० वर्षांत एकही अपघात न केलेल्या चालकांमार्फत सध्याच्या चालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्याबरोबरच केंद्रीय रस्ते वाहतूक संस्थेमार्फत (सीआयआरटी) चालकांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या माध्यमातून अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कठोर कारवाईवर भर

पीएमपीच्या चालकांकडून नियमभंग झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली जात होती. पण, चालकांना शिस्त लागावी म्हणून आता कठोर कारवाई केली जाणार आहे. अपघातामध्ये चालकांची चूक असेल, तर त्यांना निलंबितदेखील केले जाणार आहे. चालक व इतरांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले आहेत.
पुणेकरांसाठी गुड न्यूज! PMP बसेसचं गुगलवर दिसणार लाइव्ह लोकेशन, वाचा कधीपासून सुविधा मिळणार
प्रवाशांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी पीएमपीकडून प्रयत्न सुरू आहेत. अपघात रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांचा चांगली सेवा मिळावी म्हणून काम केले जात आहे.- सचिंद्र प्रताप सिंह, अध्यक्ष, पीएमपी

गेल्या दोन वर्षांतील अपघाताची आकडेवारी
वर्षे अपघात मृत्यू जखमी

२०२१-२२ ७९ १८ ३२
२०२२-२३ १३३ २२ ५७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed