• Sat. Sep 21st, 2024
पार्टी सुरु असताना वाद, तरुणाची हत्या करत रचला अपघाताचा बनाव; मात्र पोलिसांना…

नाशिक : नाशिक शहरात मागच्या गेल्या काही दिवसांपासून खुनांचे सत्र सुरूच असून नाशिकच्या सिडको परिसरातील खुनाची घटना ताजी असतानाच गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली आहे. विश्वनाथ सोनवणे पाटील (वय २६) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. नाशिक शहर पुन्हा खुनाच्या घटनेनं हादरले आहे. जुन्या वादातून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरातील कार्बन नाका येथे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दारु पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून शमशेर शेख आणि दिपक सोनवणे या दोघांनी मिळून शनिवारी रात्रीच्या सुमारास विश्वनाथ याच्यावर सपासप वार करत या तरुणाला संपवले. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यासाठी या दोन्ही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील पोलीस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले.

‘सनी देओलचा बंगला वाचवला, मग नितीन देसाईंना वेगळा न्याय का?’ संजय राऊतांचा भाजपला सवाल
यावेळी दोघांची विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलीस हवालदार पी. एस. जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या सिडको परिसरात भर चौकात तरूणाची धारदार शस्त्र आणि सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याच परिसरात काही टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड , सोनसाखळी चोरी , हत्या यासारखे गंभीर गुन्ह्यांचे प्रकार घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरिक गुन्हेगारांच्या दहशतीखाली वावरत असून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

कात्रज चौकातील वाहतूक कोंडी जैसे थे; दीड वर्षात फक्त खांबच उभे, पूल वेळेत होणार का? पुणेकरांचा प्रश्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed