• Mon. Nov 25th, 2024
    लोकलमध्ये वाढला ज्येष्ठांचा टक्का; जून महिन्यात वरिष्ठ पासधारकांची संख्या तब्बल…

    मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांचा टक्का वाढत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीतील प्रवासीसंख्येचा आढावा घेतला असता, एप्रिलमध्ये सामान्य श्रेणीतून रोज सरासरी ८४ हजार ज्येष्ठ प्रवासी प्रवास करत होते. जूनमध्ये हाच आकडा लाखापार गेला आहे.

    लोकलमधील ज्येष्ठांसाठी राखीव आसनांची संख्या अत्यंत तोकडी असल्याने के. पी. पुरुषोत्तम नायर यांनी रेल्वे प्रशासनाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात प्रकरण गेल्याने मध्य रेल्वेने त्वरेने प्रवासी सर्वेक्षण सुरू केले. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत रेल्वेने प्रवास करणाऱ्या पासधारक महिला, प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण करण्यात आले. मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक अशा सर्व पासधारकांचा यात समावेश आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. एप्रिलमध्ये रोज सरसरी एकूण ९७ हजार ११७ ज्येष्ठ प्रवासी प्रवास करत होते. यात प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची संख्या १२ हजार ८४६ इतकी आहे. जूनमध्ये पासधारक ज्येष्ठ प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसले. या महिन्यात सामान्य श्रेणीतून रोज सरासरी एक लाख आठ हजार ४३८ आणि प्रथम श्रेणीतून १५ हजार १७६ अशा एकूण एक लाख २३ हजार ६१४ प्रवाशांनी प्रवास केला आहे.

    कोकणवासीयांसाठी गुड न्यूज; गणेशोत्सवात रातराणी सुरु होणार, ‘अशी’ असेल सुविधा
    मध्य रेल्वेतील पासधारक ज्येष्ठ प्रवासी

    महिना – प्रथम श्रेणी – सामान्य श्रेणी

    एप्रिल – १२,८४६ – ८४,२७१

    मे – १५,१६३ – ८३,६८१

    जून – १५,१७६ – १,०८,४३८

    – तिकीटधारक प्रवाशांचा यात समावेश नाही.

    – महिन्याची रोजची सरासरी प्रवाशांची संख्या आहे.

    (स्रोत – मध्य रेल्वे)

    ज्येष्ठांची यूटीएस अॅपला पसंती

    रेल्वेप्रवाशांना तिकीट खिडकीच्या रांगेत उभे राहायला लागू नये, यासाठी केंद्रीय रेल्वे सूचना प्रणाली (क्रिस) यूटीएस अॅप विकसित केला आहे. महिला-पुरुषांसह ज्येष्ठ नागरिकांनीही यूटीएस अॅपला पसंती दिली आहे. एप्रिल ते जूनदरम्यान दोन लाख ७६ हजार ३९० ज्येष्ठांनी पास काढले आहे. याचा अर्थ रोज सरासरी तीन हजार ७१ ज्येष्ठांनी तिकीट खिडकीऐवजी यूटीएस अॅपने पास काढण्यास पसंती दिली आहे.

    मंजुरीअभावी प्रवास थांबला

    मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिकेवर उत्तर देताना लोकलमधील मालडबा ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्याचे नियोजन असल्याचे प्रतिज्ञापत्र मध्य-पश्चिम रेल्वेने सादर केले आहे. मालडब्यातील आसन रचनेत बदल करून वाढीव आसने देण्याची तयारी रेल्वेने पूर्ण केली आहे. मालडबे ज्येष्ठांसाठी राखीव करण्याच्या प्रस्तावावर रेल्वे मंडळाकडून उत्तर आलेले नाही. यामुळे रेल्वे मंडळाच्या मंजुरीसाठी महामुंबईतील ज्येष्ठांचा सुखद प्रवास थांबला आहे.
    मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय; पर्यायी मार्ग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed