• Sat. Sep 21st, 2024

Ajit Pawar :आज बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा; कोणत्या मुद्द्यावर बोलणार?

Ajit Pawar :आज बीडमध्ये अजित पवारांची जाहीर सभा; कोणत्या मुद्द्यावर बोलणार?

म. टा. प्रतिनिधी, बीड : राष्ट्रवादी काँग्रेसची अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये आज होणाऱ्या सभेची तयारी पूर्ण झाली आहे. पक्षाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी या सभेला उपस्थित राहणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज, रविवारी बीड शहरात होत असलेली सभा ही कोणालाही उत्तर देण्यासाठी नाही, तर उत्तरदायित्वाची सभा आहे,’ असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे या सभेत बीडच्या विकासासंदर्भात काय घोषणा होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात उपमुख्यंत्री काय बोलतात याबाबतही उत्सुकता आहे.

उपमख्यमंत्री अजित पवार, कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यासह मंत्रिमंडळातील राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत ही सभा होणार आहे.

सभेसाठी ८० बाय ४० फुटांचे भव्य स्टेज तयार करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार आणि इतर मान्यवर एकत्रित दुपारी दीडच्या सुमारास बीड शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील. त्यानंतर मुख्य रस्त्यावरील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भव्य रॅलीस सुरुवात होईल. रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोचून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून मान्यवरांचे सभास्थळी आगमन होईल. सबंध बीड जिल्ह्यातून हजारो लोक या कार्यक्रमासाठी येणार असून परळी मतदारसंघातून १५० एसटी बस आरक्षित करण्यात आल्या आहेत. या बससह खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी सुविधा उपलब्ध आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर आबा चव्हाण यांनी दिली आहे.

बीडमध्ये अजित दादांच्या सभेची जय्यत तयारी, मंत्र्यांचे ४० ते ५० फुटांचे बॅनर

अशी आहे पार्किंग सुविधा

– सर्व बसच्या पार्किंगची व्यवस्था जिल्हा रुग्णालयाच्या मागील जुन्या एसपी ऑफिसच्या मैदानात करण्यात आली आहे.
– खासगी वाहनांसाठी बार्शी रोडवरील सोमेश्वर मंदिरासमोरील नदीपात्र मैदान, आशीर्वाद लॉन्स, ज्ञानेश्वर पब्लिक स्कूलचे मैदान राखीव.
– नगर रस्त्यावर आष्टी-पाटोदा-शिरूर भागातून येणाऱ्या वाहनांना आयटीआय मैदान व चंपावती शाळेचे मैदानात पार्किंग आहे.
– बीड तालुक्यातील वाहनांना माने कॉम्प्लेक्स जवळील पारस मैदान राखीव आहे.
– मोंढा रोडवरील फटाका मैदान; तसेच जालना रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागील उत्तमनगर परिसर मैदान राखीव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed