सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी असलेल्या गावात स्मशानभूमी नाही. तसेच ओढ्यालगत शेताच्या बांधावर छोट्याशा जागेत अंत्यसंस्कार केले जातात. परंतु, पाऊस आल्यावर ओढ्याला जास्त पाणी असते. त्यावेळी तेथे पोहोचणे शक्य होत नाही. त्यामुळे, रस्त्यावर अंत्यसंस्कार करण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यामुळे पाऊस आणि ओढ्याचे पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागते. मात्र पाऊस कमी होत असल्याने अखेर तीन तासानंतर ग्रामस्थांनी भर पावसातच चितेवर आसरा म्हणून लाकडी खांब उभे करून त्यावर पत्रे टाकून अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला.
अंत्यविधीप्रसंगी पंचक्रोशीतील नागरिक व नातेवाईक उपस्थित होते. मुसळधार पावसातच या मृत व्यक्तीवर अंत्यविधी सुरु होता. ग्रुप ग्रामपंचायत घेरा सिंहगडला चार महसुली गावे असून देखील गावठाणच नाही. घेरा सिंहगड ग्रामपंचायतच्या आतकरवाडी, सांबरेवाडी, थोपटेवाडी, भडाळेवाडी, दुरुकदरा व इतर ठिकाणी स्मशानभूमीसाठी राज्य सरकारमार्फत वन विभागाची जागा मिळावी. परिणामी राज्य सरकार, जिल्हा परिषदेमार्फत स्मशानभूमी उभारता आली नाही.
गावठाण मागणीचा प्रस्ताव राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाकडे पाच सात वर्षापासून पडून आहे. वन विभागाच्या जाचक अटीमुळे प्रस्ताव अडकले आहेत. घेरा सिंहगड मधील मधील नागरिकांची स्मशानभूमीसाठीची हाल सुरु आहेत. असे आणखी किती दिवस सुरु राहणार असा सवाल ग्रामस्थ करीत आहे.
अंत्यसंस्कार झालेली महिला ज्योती लहु पन्हाळकर (वय ४१) यांचे गुरुवारी निधन झाले होते. मात्र त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. भर पावसात अंत्यसंस्कार करण्यात आले मात्र पावसामुळे पेटती चिता विझू लागल्याने ग्रामस्थांना पेटत्या चितेवर पत्रे धरावे लागले. अशी विदारक परिस्थिती असताना पुणे शहराच्या बाजूला ही घटना घडली आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे स्थानिक लोक प्रतिनिधींनी सांगितले आहे.