रामदास वडजे असं मृत्यू पावलेल्या दुचाकीस्वाराचं नाव होते. या प्रकरणात ट्रक चालक रंगनाथ तांबे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडीच्या लक्ष्मी चौकलगत आज सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिंजवडी परिसरातील लक्ष्मी चौकालगत राहणारा रामदास वडजे हा आपल्या दुचाकीवरून कामाला जात होता. परंतु मागून लोडेड असलेला ट्रक भरधाव वेगात येत होता. त्या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि लक्ष्मी चौकापुढील विठ्ठल लॉन्ससमोर रामदासच्या दुचाकीला मागून जोराची धडक बसली. रामदास हा ट्रकच्या मागील दोन्ही चाकात अडकला गेला. त्याच निम्मं शरीर चाकाखाली होते. कंबरेखालील भाग तर अक्षरशः चिरडला. त्या अवस्थेत देखील रामदास मदतीची याचना करत होता.
संबधित ट्रकच्या चालक मात्र रामदासला तशाच अवस्थेत सोडून पळून गेला. मात्र त्याला मदत करायची सोडून काही नागरिकांनी त्याचे चित्रीकरण केले. मात्र, यावेळी एक बस चालक संवेदना दाखवत त्याच्या मदतीला धावून आला. आणि त्याच्या अंगावर असलेली ट्रक बाजूला घेतली. बसमधील चालकांनी त्याला मदत करत ट्रक बाजूला घेण्यासाठी मदत केली. पोलिसांना घटनेबाबत समजल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत रामदासाला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र रामदासने तोपर्यंत जीव सोडला होता.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत फरार झालेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या आहेत. अंगावर शहारे आणणारे ही घटना अनेकांनी डोळ्यादेखत पाहिली. असा दुर्देवी शेवट कुणाच्याही वाट्याला येऊ नये अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत.