• Mon. Nov 25th, 2024
    रोहित पवार अजून लहान मात्र त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे; नेमकं असं कुणी म्हटलं?

    कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्या कोल्हापुरात निर्धार सभा घेत आहेत. या सभेअगोदरच दोन्ही गटांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरू झाली आहे. आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
    दादा आमच्या प्रश्नांची उत्तरं बीडच्या सभेत मिळतील का? शेतकऱ्याच्या लेकाचे अजित पवारांना सवाल
    कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि नातेवाईक वारंवार त्रास देत असल्याचे तक्रारी आम्हाला आल्या आहेत हे योग्य नाही. यामुळे उद्योजक येथे येत नाहीत आणि यामुळे युवकांना रोजगार भेटत नाही, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांच्यावर केला आहे. तर हसन मुश्रीफ यांनी देखील याला जोरदार प्रत्युत्तर दिले असून जमिनी या भूमिपुत्रांच्या गेल्या आहेत. यामुळे अगोदर एमआयडीसीत नोकऱ्या भूमिपुत्रांना द्यायला हव्यात. तक्रारी कोणी केल्या हे त्यांनी स्पष्ट करावं, असे म्हणत रोहित पवार हे अजून लहान आहेत. पण त्यांना अजित पवार यांची जागा घ्यायची आहे, असा आरोप ही मुश्रीफ यांनी रोहित पवार यांच्यावर केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुहूर्तमेढ रोवलेल्या कोल्हापुरात पक्षात बंड झाल्यानंतर पहिल्यांदाच शरद पवार निर्धार सभा घेत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवस अगोदरच आमदार रोहित पवार हे कोल्हापुरात दाखल झाले असून ते विविध मतदार संघात जाऊन आढावा देखील घेत आहेत. शिवाय आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योजकांना मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आणि नातेवाईक त्रास देत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे आधी देखील आल्या होत्या आता देखील येत आहेत. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे, अशा वातावरणात नवीन कंपन्या आपल्या जिल्ह्यात येत नाहीत. त्यामुळे तरुणांच्या नोकरीचा प्रश्न सुटत नाही, असा गंभीर आरोप मुश्रीफ यांच्यावर केला असून याला मुश्रीफ यांनी ही प्रतिउत्तर दिले आहे.

    स्वागतासाठी कार्यकर्त्यांची गर्दी; गाडीतून उतरत शरद पवारांनी स्वीकारल्या शुभेच्छा

    कोणी तक्रारी केल्या या रोहित पवार यांनी स्पष्ट करावे. एमआयडीसीतील नोकऱ्या भूमिपुत्रांना द्यायला हव्या, या मागण्या योग्य आहेत. भूमिपुत्रांच्या जमिनीत त्या उद्योगांसाठी गेल्या आहेत. आरोप करण्यासाठी जागा नाही, त्यामुळे ते आमच्यावर काहीही आरोप करत आहेत, असे म्हणत शरद पवार यांना दसरा चौकातील मैदानासारख्या छोट्या मैदानात आणायला नको होते. पवार साहेबांची सभा ही तपोवन मैदान किंवा पेटाळा मैदान या ठिकाणी होणे अपेक्षित होतं. मात्र रोहित पवार हे अजून लहान आहेत. त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांनी कुटुंबातील वाद मिटवायला हवेत वाढवायला नको होते, असं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

    तर १९९८ मध्ये हसन मुश्रीफ यांच्यावर विश्वास टाकावा, अशी अनेकांची मते नव्हती. पण कार्यकर्ता माझा आहे, म्हणत पवार साहेबांनी त्यांना संधी दिली. नेत्यांमुळे ताकद होती असे नाही. कार्यकर्ते सुद्धा महत्वाचे आहेत. अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही. आता निष्ठावंत कार्यकर्ते सांगत आहेत की पूर्वी पेक्षा जास्त ताकदीने लढू, असे रोहित पवार म्हणाले आहेत. याला ही मुश्रीफ यांनी प्रतिउत्तर दिले की, त्यावेळी मी स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या नेतृत्वाखालीच लढलो. मग विरोध कोणाचा होता हे रोहित पवार यांनी सांगावं. निवडणुका ह्या त्या -त्या वेळच्या परिस्थिती आणि वातावरणावर अवलंबून असतात, असे मुश्रीफ म्हणाले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *