एप्रिल महिन्यामध्ये या टोळीने एर्नाकुलम निझामुदिन एक्स्प्रेसमध्ये मडगाव ते दिल्ली या दरम्यान एका महिलेचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स चोरली होती. या बाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार, या गुन्ह्याचा लोहमार्ग पोलिसांच्या भायखळा येथील विशेष कृती दलाकडून समांतर तपास सुरू करण्यात आला होता. त्या अनुषंगाने एसटीएफच्या पथकाकडून पनवेल स्थानकातून जाणाऱ्या मेल / एक्स्प्रेस गाड्यांवर गस्त घालण्यास सुरुवात करण्यात आली. यादरम्यान मेल/एक्स्प्रेस गाडीमध्ये किरकोळ वस्तू विकणारे फेरीवाले झोपलेल्या प्रवाशांच्या पर्स आणि मोबाइल फोनची चोरी करत असल्याची माहिती एसटीएफच्या पथकाला मिळाली.
हे संशयित फेरीवाले रत्नागिरी येथे वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर एसटीएफच्या पथकाने तेथे जाऊन तांत्रिक तपास करून रामईश्वर साहानी, खुबलाल महतो आणि बिनोद महतो तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या तिघांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर एसटीएफच्या पथकाने चोरीस गेलेल्या मालाव्यतिरिक्त चार लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, २१ हजार रुपये किमतीचे घड्याळ, तीन लाख २७ हजार रुपये किमतीचे १७ मोबाइल फोन, ५२ हजार रुपये किमतीचा टीव्ही आणि रोख असा एकूण आठ लाख ५८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या चोरांनी पनवेल, त्रिसूर, कोकण रेल्वे आणि कोटाव्यम रेल्वे पोलीस ठाणे या भागात केलेले चोरीचे सात गुन्हे उघडकीस आले असून या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे. ही कामगिरी मुंबई लोहमार्गाचे सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतीश चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा लोहमार्ग मुंबईचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुददीन शेख, सहायक पोलीस निरीक्षक हेमराज साठे, पोलीस उपनिरीक्षक दीपक शिंदे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश खाडे आदींच्या पथकाने केली.