• Sat. Sep 21st, 2024

विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. ला अभ्यासदौरा

ByMH LIVE NEWS

Aug 24, 2023
विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांचा जर्मनी, नेदरलॅंड्स आणि यु.के. ला अभ्यासदौरा

मुंबई, दि. २४ : महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सन्माननीय सदस्यांसाठी दिनांक २४ ऑगस्ट ते ०४ सप्टेंबर,२०२३ या कालावधीत तीन युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात २२ सन्माननीय सदस्य सहभागी झाले आहेत. या दौऱ्यात ०६ अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यास दौऱ्याला परराष्ट्र व्यवहार मंत्रालय,भारत सरकार, यांची मान्यता (Political Clearance) प्राप्त झाली आहे. अभ्यास दौऱ्यावरील सन्माननीय सदस्यांचे शिष्टमंडळाचे नेतृत्व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे करत आहेत. फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड्स) आणि लंडन (यु.के.) या शहरांना भेट देईल. एकूण २२ सन्माननीय सदस्यांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला सदस्या या शिष्टमंडळात सहभागी झाल्या आहेत.

राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालयाला तसेच अन्य अभ्यासभेटींचे आयोजन

अभ्यासदौऱ्यात प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आली आहे.

ॲमस्टरडॅम येथे नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रांतील तज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच (UN Women And Gender Equality Forum) सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सन्माननीय सदस्य भेट घेतील.

त्याचप्रमाणे लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडन, (UN Women Orgnisation And Gender Equality Forum in United Kingdom), लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय  आणि महासचिव (Secretary-General, CPA Headquarters) यांच्या समवेतदेखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.

००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed