भाजपच्या दोघां माजी नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी होऊन परस्परांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने काही वेळ चिमटेश्वर महाराजांच्या मिरवणुकीत गोंधळासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सोलापुरातील काँग्रेस भवनात दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीदिनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत अभिवादनासाठी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस भवनातून बाहेर पडल्या. राजीव गांधी जयंती कार्यक्रमात छायाचित्र काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन कार्यकर्ते एकमेकांना भिडले. एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की झाली.
सोलापूरच्या राजकीय क्षेत्रात हा प्रकार ताज असताना भाजपमध्ये देखील सोमवारी असाच प्रकार पाहायला मिळाला. काँग्रेस भवनमधील वाद काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, आंबादास करगुळे, विनोद भोसले आदींनी रविवारी सायंकाळी हस्तक्षेप करून मिटवला. नागपंचमीनिमित्त सोलापूर शहरात बलिदान चौकातून चिमटेश्वर महाराजांची मिरवणूक काढली जाते. मिरवणूकीला पूजा करून सुरूवात केली जाते. पूजेच्या या कार्यक्रमादरम्यान भाजपच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली. कार्यक्रमाला खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे उशिरा आले. त्यावेळी फोटो काढण्यावरून भाजपचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आणि भाजप कार्यकर्त्यामध्ये हमरीतुमरी झाली.
भाजपचे माजी महापालिका सभागृह नेते सुरेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे आणि इतर प्रमुख नेते खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजींची वाट पाहात ताटकळत थांबले होते. तेव्हा उशीर होऊ लागल्यामुळे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दोनवेळा खासदार डॉ. जयसिध्देश्वरांशी थेट संपर्क केला. तरीही ते उशिरा आले. खासदारांनी येताना सुरेश पाटील यांना आणले होते. सुरेश पाटील आणि राजकुमार पाटील हे पक्षांतर्गत विरोधक आहेत. राजकुमार पाटील यांना पाहून सुरेश पाटील यांच्या रागाचा पारा वाढला. तेव्हा राजकुमार पाटील आणि सुरेश पाटील वादविवाद करत एकमेकांशी भिडले. खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य आणि अन्य पक्षांच्या पदाधिका-यांच्या समोर दोघांनी एकमेकांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली.