क्षीरसागर घराण्यातील आमदार संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत आहेत. त्यांनी गेल्या आठवड्यात बीडमध्ये शरद पवार यांची स्वाभिमान सभा आयोजित केली होती. त्यामुळे त्यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र, जयदत्त क्षीरसागर यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी ‘वेट अँड वॉच’चे धोरण अवलंबल्याचे दिसते. जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत असणारे दुसरे पुतणे योगेश क्षीरसागर यांनी मात्र वेगळा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती असून, याच आठवड्यात ते अजितदादांच्या गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
‘माझा कुठलाही राजकीय निर्णय नाही’
राजकीय गदारोळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्यानंतर माजी मंत्री जयददत्त क्षीरसागर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ‘गेल्या ५० वर्षात बीड जिल्ह्यातील जनतेने आणि माझ्या जीवलग कार्यकर्त्यांनी माझ्या राजकीय व सार्वजनिक प्रवासात प्रेम आणि पाठबळ दिलेले आहे. अशा जीवाभावाच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी कोणताही राजकीय निर्णय घेणार नाही. विकासासाठी व जनहितासाठी सतत पाठपुरावा आणि संघर्ष सुरू राहील. सध्या होत असणाऱ्या चर्चेत किंवा राजकीय निर्णयात माझा कसलाही सहभाग नाही, भविष्यात योग्य वेळी सर्वांना विश्वासात घेऊन योग्य राजकीय निर्णय घेतला जाईल. माझ्या राजकीय स्वार्थासाठी मी कुठलेही निर्णय कधीही घेतलेले नाही, जनतेचा कौल जो असेल तोच माझा निर्णय असेल,’ अशी प्रतिक्रिया माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिली आहे.