सातारा दि.21 (जिमाका) : सद्यस्थितीत जिल्ह्यात 74 टँकर सुरु आहेत. ज्या गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याच्या टँकरची मागणी येईल, त्या ठिकाणी तात्काळ टँकर सुरु करावेत. तसेच आठ दिवसात पाऊस न पडल्यास ज्या ठिकाणी चारा छावणी सुरु करण्याची आवश्यकता निर्माण होईल, अशा ठिकाणचे संभाव्य आराखडे तात्काळ प्रांताधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
टंचाई आढावा बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये संपन्न झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार सर्वश्री पृथ्वीराज चव्हाण, अरुण लाड, शशिकांत शिंदे, महेश शिंदे, मकरंद पाटील, दिपक चव्हाण, प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक अदिती भारद्वाज, उपजिल्हाधिकारी (रोहयो) विजया यादव यांच्यास प्रांताधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.
पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होत आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 74 टँकर सुरु करण्यात आले आहेत. त्याचबरोबर 21 विहिरी व 30 बोअरवेल अधिग्रहण करण्यात आले आहेत. तसेच गरजेनुसार विहिरी व बोओरवेलचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करणे व शिवारात असणारी पिके कशी तरतील हे पहाणे याबाबींना प्रधान्य असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई यांनी आवश्यक असेल तेथे तात्काळ टँकर सुरु करण्यात यावेत , अशा सूचना प्रशासनाला दिल्या.
नियमित पाण्याच्या अर्वतनाबाबत बोलतांना पालकमंत्री म्हणाले, कोणाचेही हक्काचे पाणी अडविले जाणार नाही. गतवर्षी किती अर्वतने सोडली या वर्षी किती अधिकची अर्वतने सोडावी लागतील. याचा अहवाल त्वरीत सादर करावा. पिके वाळणार नाहीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. संभाव्य टंचाई स्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासन सतर्क असून याकामी निधी कमी पडू देणार नाही. उपसासिंचन योजनांचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याचेही निर्देश त्यांनी बैठकीत दिले. पिण्यासाठी दुषित पाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशित करुन ज्या ठिकाणी तक्रारी येतील तेथील नमुने तपासणीसाठी पाठविण्याचे सूचित केले.
0000