मराठवाड्यात काही भाग वगळता सर्वत्र पावसाने दडी मारली आहे. दीर्घकाळ पाऊस झाला नसल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान होत आहे. पिके सुकली असून पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. सिंचनासाठीही पाणी नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विभागातील धरणात जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे. बहुतांश लघु प्रकल्प कोरडे असल्यामुळे परिसरातील गावांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विभागातील मोठ्या ११ प्रकल्पात ४२.६३ टक्के पाणीसाठा आहे. तसेच ७५ मध्यम प्रकल्पात २२.५३ टक्के, ७४९ लघु प्रकल्पात २१.७२ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यात ३६.८० टक्के आणि तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २७ बंधाऱ्यात ३३ टक्के पाणीसाठा आहे.
मराठवाड्यात एकूण ८७७ प्रकल्पात फक्त ३५.६९ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. जायकवाडी धरणात ३४ टक्के पाणी आहे. येलदरी ६०, सिद्धेश्वर ४४, माजलगाव १४, मांजरा २६, उर्ध्व पेनगंगा ६४, निम्न तेरणा २८, निम्न मनार ५१, विष्णुपुरी ८१, निम्न दुधना २७ आणि सिना कोळेगाव शून्य टक्के अशी धरणनिहाय पाण्याची टक्केवारी आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ पैकी ४५ लघु प्रकल्प कोरडे आहेत. जालना जिल्ह्यातील ५७ पैकी ५०, बीड जिल्ह्यातील १२६ पैकी ८७, धाराशीव जिल्ह्यातील २०६ लघु प्रकल्पांपैकी १०९ प्रकल्प कोरडे आहेत. या भागात पुरेसा पाऊस न झाल्यास तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मागील महिन्यात २८ टँकर सुरू होते. थोडा पाऊस झाल्यानंतर टँकर बंद करण्यात आले होते. आता पुन्हा छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात प्रशासनाने ८३ टँकर सुरू केले आहेत.
सात मध्यम प्रकल्प कोरडे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असल्याने धरणात पाणीसाठा नाही. जिल्ह्यात १६ मध्यम प्रकल्प असून सात प्रकल्प पूर्ण कोरडे आहेत. इतर धरणातही जेमतेम पाणीसाठा शिल्लक आहे.
सुखना १२ टक्के, टेंभापुरी ३५, ढेकू २०, नारंगी १९, नारंगी १९, वाकोद २५, गिरजा २९, अंजना पळशी २८, शिवना टाकळी २१ आणि अजिंठा अंधारी प्रकल्पात १८ टक्के पाणीसाठा आहे. लाहुकी, कोल्ही, बोरदहेगाव, अंबाडी, गडदगड, पूर्णा नेवपूर, खेळणा प्रकल्प पूर्ण कोरडे आहेत.