• Sat. Sep 21st, 2024

Nag Panchami Day Special: सापाला जीवदान देण्यास ‘ती’ही असते तत्पर; गोष्ट नागपुरातील एका मर्दानीची

Nag Panchami Day Special: सापाला जीवदान देण्यास ‘ती’ही असते तत्पर; गोष्ट नागपुरातील एका मर्दानीची

नागपूर : साडेसहा फुटांचा कोब्रा नाग वैशालीनगर परिसरातील एका घरी आढळला. त्याला बघून कुटुंबातील सदस्यांची बोलतीच बंद झाली. घाबरलेल्या अवस्थेतच त्यांनी सर्पमित्र मित्र म्हणून काम करणाऱ्या मनीषनगर येथील चैताली भस्मे हिच्याशी संपर्क साधला. चैतालीने एका ड्रमच्या मागे लपलेल्या या नागाला अरुंद जागेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. साडेसहा फूट लांब असलेल्या या सापाने चैतालीवर फणा काढत चावा घेण्यासाठी धाव घेतली. काठीचा स्पर्श करताच तो फुत्कारला. अर्धा तास असा थरार चालल्यानंतर अखेर मोठ्या शिताफिने चैतालीने त्याला बरणीत बंद केले.

नागपुरातील चैतालीने वयाच्या १३व्या वर्षांपासून तिने सापाशी मैत्री केली. ती आजतागायत कायम असून गेल्या १५ वर्षांपासून तिने आतापर्यंत हजारो सापांना जीवनदान दिले. कोब्रा, सरेल वायपर, मण्यार यांसारख्या विषारी सापांनाही न घाबरता तिने मुक्त केले. साप दिसला की अनकेजण तिला अधिकारवाणीने बोलावतात आणि सापाला पकडल्यानंतर तिचे तोंडभरून कौतुक करतात.

‘ही दोस्ती तुटायची नाय’

चैतालीच्या अशा धाडसामागील कथाही तेवढीच मजेशीर आहे. चैताली तशी मूळची यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील. पाच बहिणी आणि भाऊ अशा मोठ्या परिवारात वाढत असताना तिला बालपणापासूनच साप दिसला की आनंद व्हायचा. कुटुंबातील इतर सदस्यांची मात्र घाबरगुंडी उडायची. चैताली १३ वर्षांची असताना तिच्या घरात घोरपड घुसली होती. तिला मारण्यासाठी आजूबाजूंच्या लोकांनी धाव घेतली. मात्र, चैतालीने विरोध करत दोरीच्या साहाय्याने तिला पकडले आणि मुक्त केले. त्यानंतर सापांनाही ती पकडायला लागली. कोणते साप विषारी, कोणते बिनविषारी याचा अभ्यास तिने केला. साप पकडण्याचे तंत्र तिने स्वत:च अवगत केले. लग्नानंतरही तिने सापांशी असलेली मैत्री जोपासली आहे. तिच्या अशा साहसाला पूर्वी कुटुंबाचा विरोध होता; मात्र आता सगळे सहकार्य करत असल्याचे चैताली सांगते. नाट्य-चित्रपट क्षेत्रात काम, योगाचा अभ्यास तसेच कविता करण्याचा छंद जोपासतानाच ती या क्षेत्रात काम करीत सापांचा जीव वाचविण्यालाही तेवढेच प्राधान्य देते.
४ वर्षीय चिमुकलीचे अपहरण, नराधमाचे संतापजनक कृत्य; विठ्ठलाची पंढरी सुन्न…
या धाडसाचेही कौतुक

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे राहणारी शिवाणी गौरकर ही गेल्या दोन वर्षांपासून नागपुरात नोकरी करते. आपले काम सांभाळून ती सर्पमित्र म्हणूनही काम करते. काहीसे मुलांसारख्या पेहरावाला प्राधान्य देणाऱ्या शिवाणीनेही बालपणापासून साप पकडण्यासारख्या धाडसी क्षेत्रात उडी घेतली. घराभोवतीचा परिसर जंगलाचा असल्याने परिसरात खूप साप आढळून येत. मात्र गावातील लोक त्यांना मारत असत आणि जाळूनही टाकत असत. या घटनेने शिवाणीच्या मनात चिड निर्माण झाली. या सापांना वाचविण्याचे काम तिने हाती घेतले. इको-प्रो संस्थेच्या माध्यमातून तिने कामाला सुरुवात केली. संस्थेचे सदस्य संदीप जीवने यांच्याकडून तिने प्रशिक्षण घेतले. सुरुवातीला धामण साप हातात पडकला होता, तेव्हा थंड लागल्याने घाबरून सोडून दिला होता. मात्र योग्य प्रशिक्षण मिळाल्याने आता सापांची भीती वाटत नसल्याचे शिवाणी सांगते. शिवाणीनेही आतापर्यंत विषारी सापांसह हजारो सापांना मुक्त करून जंगलात सोडले. साप चावलेल्यांचे जीव वाचविण्यासाठीही ती धडपडत असते. पुरुषांसह महिलाही आता या क्षेत्रात येऊ लागल्या आहेत. तेजश्री गुलटकर, मीनल चांदवसकर यासुद्धा सर्पमित्र म्हणून काम करतात, असे वाइल्ड लाइफ वेलफेअर सोसायटीचे सचिव नितीश भांदक्कर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed