मंत्र्यांची एक खासगी बैठक शुक्रवारी पार पडली. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णय यावर चर्चा सुरू होती. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पवार यांनी थेट राज्याच्या प्रमुखालाच प्रश्न विचारल्याने बैठकीला उपस्थित असलेले मंत्री अजित पवारांच्या या पवित्र्याने काही काळ आश्चर्यचकित झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी पवारांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहिती देत शिंदे यांनी पवारांनाच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचे समजते.
या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. साहजिकच या विषयाला वेगळे वळण लागू नये, हे आधीच ओळखून फडणवीस यांनी लगेचच वेगळा विषय काढून मूळ विषयाला बगल दिली.
शिवसेनेचे मंत्री, आमदार अस्वस्थ
अजित पवार यांच्या या प्रश्नामुळे मात्र, शिवसेनेचे मंत्री; तसेच आमदार अस्वस्थ झाल्याचे समजते. ‘महाविकास आघाडीत असतानाही अजित पवारांची अडचण होती आणि आताही अडचणच आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार या पार्श्वभूमीवर खासगीत देत आहेत. एकीकडे अजित पवारसमर्थक अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे फलक महाराष्ट्रभर लावत असताना, आता अशा प्रकारचे वाद व्हायला सुरुवात झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सरकारमधील समतोल राखण्याची जबाबदारी आल्याचीही चर्चा या निमित्ताने अधिकारी व भाजप आमदार, नेत्यांमध्ये या निमित्ताने सुरू झाली आहे.