• Sat. Sep 21st, 2024
Pune News: ३२ वर्षांपूर्वीचा प्रश्न नऊ तासांत सुटला; पुण्यात ‘या’ चौकातील अतिक्रमण जमीनदोस्त

पुणे : भूसंपादनाअभावी तब्बल ३२ वर्षे रखडलेल्या मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा चौकातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न महापालिका प्रशासनाने शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करून सोडवला. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने रस्त्याच्या कडेचा राडाराडा आणि झाडेझुडपे काढून २४ मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात आले. अरुंद रस्त्यामुळे मुंढवा चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. आता रस्ता रुंदीकरणामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात सुटका होण्यास मदत होणार आहे.

मगरपट्टा-खराडी रस्त्यावरील मुंढवा उड्डाणपुलापासून मुंढव्यातील महात्मा फुले चौकापर्यंत रस्त्याच्या कडेला जागामालकांनी राडाराडा टाकून रस्ता अडवला होता. गेल्या ३२ वर्षांपासून हे रुंदीकरण रखडले होते. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी होऊन, नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अरुंद रस्त्यामुळे मुंढवा चौकात एकाच मार्गिकेवरून वाहतूक सुरू होती. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.

सरकारमध्ये भाजपचे फक्त पाच-सहा जण, इतकं सगळं करुन काय हाती लागलं? आदित्य ठाकरेंचा सवाल
रात्री दहा ते सकाळी सात या वेळेत चाललेल्या कारवाईदरम्यान, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, उपआयुक्त राजेंद्र देशमुख, कार्यकारी अभियंता संदीप रणवरे, भूसंपादन विभागाच्या रूपाली ढगे, मुंढवा विभागाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे, विभागीय क्षेत्रीय अतिक्रमण अधिकारी सुभाष तळेकर, अतिक्रमण निरीक्षक संजय जाधव, धम्मानंद गायकवाड, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विष्णू ताम्हाणे व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

– महापालिकेने जेसीबीच्या साह्याने शुक्रवारी मध्यरात्री कारवाई करून अतिक्रमण जमीनदोस्त केले.

– कारवाईवेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे रात्रभर घटनास्थळी उपस्थित होते.

‘बॉटल नेक’ही काढला

या कारवाईत महापालिकेने अतिक्रमणासह मुंढव्यावरून मगरपट्ट्याच्या दिशेने जाताना चौकातील पीएमपीचा बस थांबा काढला. काही अंतरावरील पेट्रोल पंपासमोरील जागेची मोजणी करून तेथील जागाही ताब्यात घेतली. त्यामुळे या परिसरातील ‘बॉटल नेक’ काढण्यात प्रशासनाला यश आहे. परिणामी, आता रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी एक मार्गिका वाढून वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.

दोन महिन्यांपासून नियोजन

रस्ता रुंद करण्यासाठी अनेक अडथळे होत असल्याने महापालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून गुप्त नियोजन सुरू केले होते. महापालिका प्रशासन, भूसंपादन विभाग आणि पथ विभागाच्या वतीने शुक्रवारी रात्री दहा वाजता मुंढवा पोलिसांच्या कडक बंदोबस्तात रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले. सकाळपर्यंत रस्त्याची रुंदी वाढून २४ मीटरचा रस्ता अस्तित्त्वात आला होता.

मुंढवा चौकातील कारवाईमुळे रस्ता २४ मीटरपर्यंत रुंद झाला आहे. त्यामुळे मुंढवा चौक येथे नेहमीपेक्षा एक मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाली असून, पुणेकरांना वाहतूक कोंडीतून काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका

कांदाप्रश्न पेटणार! कांद्यावर ४० टक्के निर्यातशुल्क; कांदा उत्पादक संघटना आक्रमक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed