मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या तलावांपैकी भातसा आणि अप्पर वैतरणा तलाव राज्य शासनाच्या अखत्यारित येतात. या सर्व तलावांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या तलावांमधून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या विहार तलाव १०० टक्के आणि तुळशी तलाव ९९ टक्के भरलेला आहे. मात्र, मुंबई महापालिका क्षेत्राच्या एकंदरीत पाणीपुरवठ्याचा विचार करता विहार आणि तुळशी तलावांमधील जलसाठा हा अत्यल्प आहे. त्यामुळे या दोन तलावांमधील पाणीसाठ्याच्या आधारे व्यापक निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
शनिवारी प्रमुख तलावांपैकी सर्वाधिक क्षमता असणाऱ्या तलावांपैकी अप्पर वैतरणा तलावातील जलसाठा ७१.०९ टक्के आहे, तर भातसा तलावातील जलसाठा ७८.१६ टक्के आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील एकूण जलसाठा हा ८३.५१ टक्के आहे. हे लक्षात घेता, मुंबईची पाणीचिंता काही प्रमाणात निश्चित दूर झाली असली, तरी अद्याप पूर्ण मिटलेली नाही, असेही मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरवर्षी १ ऑक्टोबर ही तारीख पाणीपुरवठा नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची असून, या दिवशी सर्व तलावांमधील जलसाठा १०० टक्के असल्यास पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ती समाधानकारक मानण्यात येते. त्यामुळे यावर्षी ऑक्टोबरमधील जलसाठा किती असेल, त्यावर पुढील पावसाळ्यापर्यंतचे नियोजन अवलंबून असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे तलाव पूर्णपणे भरलेले नसतानाही तलावांचे दरवाजे काही प्रमाणात उघडावे लागतात. यंदाच्या पावसाळ्यात मध्य वैतरणा तलावाचे दोन दरवाजे या आठवड्यात उघडण्यात आले होते. त्यातून सोडण्यात आलेले पाणी हे त्याच नदी प्रवाहात खालच्या बाजूला असणाऱ्या मोडकसागर तलावात साठविण्यात आले. मात्र, हे पाणी तांत्रिक कारणांमुळे सोडण्यात आले होते. काही प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांनी त्याचा अर्थ तलाव ओसंडून वाहू लागला असा काढला, जो वस्तुस्थितीला धरून नाही, असेही मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
दहा दिवसांत दोन टक्केच पाणीवाढ
यंदाच्या पावसाळ्यामध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरुवातीला अपूर्ण पर्जन्यवृष्टीमुळे जलसाठा घटला होता. ती स्थिती लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत सुधारणा होईपर्यंत मुंबई महापालिकेतर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात १ जुलैपासून १० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता. ९ ऑगस्टला पाणीसाठा ८१ टक्के असल्याने ही कपात मागे घेण्यात आली. पाणीकपात मागे घेतल्यानंतरही मुंबईत पाऊस पडलेला नाही. गेल्या दहा दिवसांत तर तलावातील जलसाठ्यात अवघ्या दोन टक्क्यांनीच वाढ झाली आहे.
तलावांतील पाणीसाठा
– अप्पर वैतरणा – ७१.०९ टक्के
– मोडक सागर – ९५.६५ टक्के
– तानसा – ९७.८८ टक्के
– मध्य वैतरणा – ९६.०१ टक्के
– भातसा – ७८.१६ टक्के
– विहार – १०० टक्के
– तुळशी – ९८.६३ टक्के