• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai News: मुंबईत सात लाख उंदरांचा महापालिकेकडून खात्मा, ‘अशी’ लावतात विल्हेवाट

    मुंबई : मुंबईत जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२३ या दीड वर्षात आढळलेल्या सात लाखांहून अधिक उंदरांचा शोध घेत त्यांचा खात्मा करण्यात आला आहे. उंदरांचा नायनाट करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांपैकी १७ वॉर्डांमध्ये खासगी संस्था कार्यरत आहेत. उर्वरित वॉर्डांमध्ये काम करण्यासाठी संस्था पुढे आल्या नसून, त्यामुळे पालिकेसमोरही मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रत्येक उंदरामागे या संस्थांना मोबदला दिला जातो.

    लेप्टो स्पायरोसिस पसरण्यास कारणीभूत ठरणाऱ्या उंदरांचा नायनाट करण्यासाठी मुंबई महापालिकेने नोंदणीकृत, तसेच बेरोजगारी सहकारी सेवा संस्था आदी संस्थांची निवड केली आहे. या सस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून उंदीर मारण्याचे काम मध्यरात्री केले जाते. दिवसाला १०० उंदीर मारल्यास उंदरामागे २३ रुपये मोबदला दिला जातो. १००पेक्षा अधिक उंदीर मारल्यास प्रत्येकी २५ रुपये देऊन अधिकचा मोबदला दिला जातो. मुंबई महापालिकेच्या कीटकनाश विभागातर्फे ही मोहीम राबवली जाते. उंदरांना काठीने मारण्याबरोबरच अॅल्युमिनिअम फॉस्फाइडच्या गोळ्या टाकूनही मारले जाते. पावसाळ्यात ही मोहीम बंद असते. मात्र, पावसाची उघडीप असल्यास मोहीम तीव्र करतात. सध्या ही कामे करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या २४ वॉर्डांपैकी १७ वॉर्डांमध्ये फक्त दहा संस्थांनीच पुढाकार घेतला आहे. उर्वरित वॉर्डांमध्ये काम करण्यासाठी संस्थाच पुढे येत नसल्याची माहिती मुंबई महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

    Mumbai News: मुंबईकरांनो ‘जेली फिश’, ‘स्टिंग रे’ पासून सावध राहा, समुद्रकिनारी काय काळजी घ्याल?
    पालिकेने खासगी संस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या मोहिमेत गेल्या दीड वर्षात सात लाख आठ हजार ८१३ उंदरांचा खात्मा केला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२२मध्ये तीन लाख ५३ हजार ४९९ उंदीर मारण्यात आले होते. जानेवारी ते ९ ऑगस्टपर्यंत तीन लाख ५४ हजार ८१३ उंदीर मारण्यात आले आहेत. आणखी चार महिने शिल्लक असून, हे काम पुढेही सुरूच राहणार आहेत. गेल्या वर्षी उंदीर मारण्यासाठी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. यंदा त्याहून अधिक खर्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    …अशी लावतात विल्हेवाट

    उंदीर मारल्यानंतर त्या-त्या वॉर्डमधील पालिकेचे संबंधित कर्मचारी उंदीर मारल्याची मोजदाद करून नोंद करतात. त्यानंतर या उंदरांची विल्हेवाट लावण्यात येते. देवनार येथील डंपिंग ग्राउंडवर मोठे खड्डे खणून त्यात मारलेल्या उंदरांना टाकले जाते. पूर्वी मारलेल्या उंदरांना जाळले जात होते. मात्र, त्यातून निघणारा धूर, राख इत्यादीमुळे दुर्गंधी आणि प्रदूषण होऊन आजूबाजूच्या परिसरातील लोकांना त्रास होत होता. त्यांच्या तक्रारीनंतर उंदरांना खड्ड्यात पुरण्यात येऊ लागले.

    ‘अल्ट्रासोनिक तंत्रज्ञाना’वर विचार

    रुग्णालयातही उंदरांचा उपद्रव होत असतो. हा त्रास थांबवण्यासाठी मुंबई महापालिका रुग्णालयात अल्ट्रासोनिक तंत्रज्ञान बसवण्याचा विचार करीत आहे. यामधून होणाऱ्या किरणोत्सारामुळे उंदीर मारले जातील किंवा त्यांना पळवून लावणे शक्य होणार आहे. ही यंत्रणा बसवण्याबाबत पालिकेच्या कीटकनाशक आणि आरोग्य विभागाकडून सध्या आढावा घेतला जात आहे.

    Mumbai News: मुंबईची पाणीचिंता कायम! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत एवढे टक्के पाणीसाठा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed