• Sun. Sep 22nd, 2024

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! राज्यात सर्वाधिक मलेरिया रुग्ण मुंबईतच, स्वाइन फ्लूचंही नवं संकट

मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! राज्यात सर्वाधिक मलेरिया रुग्ण मुंबईतच, स्वाइन फ्लूचंही नवं संकट

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळा सुरू झाल्यानंतर राज्यामध्ये मलेरिया रुग्णसंख्या वाढती आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येमध्ये मुंबईतील मलेरिया रुग्णांचा टक्का सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. मुंबईमध्ये राज्यातील एकूण मलेरिया संख्येतील ३६.५ टक्के रुग्णांची नोंद झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यात ८०४० पैकी २९८५ मलेरिया रुग्ण हे मुंबईत असल्याचे दिसून आले आहे.

पावसाळ्यातील आजार, डासांची वाढती उत्पत्तीस्थळे तसेच बांधकामक्षेत्रांची वाढती व्याप्ती यामुळे, पाणी साठवण्याच्या जागांवर डासांचे वाढते प्रमाण यामुळे मलेरियांच्या डासांचा त्रास वाढला आहे. गेल्यावर्षी मलेरिया आणि डेंग्यू या दोन्ही आजारांची रुग्णसंख्या वाढती होती. करोनाकाळात डासांचा प्रतिबंध करण्यासाठी योग्यप्रकारे उपाययोजना करण्यात न आल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला होता.

पालिकेच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेरियासाठी कारणीभूत असलेल्या डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सातत्याने धूरफवारणीसह पाणी साचू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेकडे सातत्याने आवाहन करण्यात येते तरीही त्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे डासांची पैदास वाढून मलेरियाची रुग्णसंख्या वाढते.

नियम पालनाची सूचना

महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मलेरियाच्या डासांची पैदास वाढू नये यासाठी बांधकाम क्षेत्राला सूचना देण्यात आल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळल्या जाव्यात यादृष्टीने निर्देश देण्यात आले आहेत. २०३०पर्यंत मलेरियाचे उच्चाटन करण्याचा निर्धार आरोग्य यंत्रणेने केला आहे. मात्र यावर्षी जानेवारी ते १४ ऑगस्टपर्यंत राज्यात मलेरियामुळे सहा जणांचा मृत्यूही झाला आहे.
मुंबईत ५ वर्षांत जन्मली ५२ हजार कमी वजनाची बाळं; डॉक्टरांनी सांगितलं मोठं कारण
स्वाइन फ्लू वाढता

स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्येही वाढ दिसून येत आहे. जून ते १६ ऑगस्ट या कालावधीमध्ये मुंबईत स्वाइन फ्लूच्या १,१७४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात एच३ एन२ च्या रुग्णांची संख्या अधिक असून ती ८९७ इतकी आहे. तर १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये मुंबईत १०५५ स्वाइन फ्लू रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. स्वाइन फ्लूमुळे जानेवारी ते मे २०२३ या कालावधीमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला असून जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed