म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ४,०८२ घरांच्या सोडतीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या घरांची किंमत थोडीफार कमी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. त्यामुळे नव्याने सोडत काढण्यात येणाऱ्या घरांचे दर कमी असणार का, हे पाहावे लागेल. २५ ऑगस्टला जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १० हजार घरांसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु होईल. यामध्ये पुण्यातील सर्वाधिक ५००० घरांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ही घरे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकल्पांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या सोडतीत अत्यल्प, अल्प, माध्यम आणि उच्च अशा सर्व उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्याचबरोबर पुणे, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर येथील घरांसाठीही सोडत काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कोकण मंडळानेही चार हजार घरांच्या सोडतीच्या जाहिरातीच्या कामाला वेग दिला आहे.
ठाणे, विरार – बोळिंज, डोंबिवली आणि अन्य ठिकाणच्या अंदाजे साडेचार हजार घरांसाठी ऑगस्टअखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. औरंगाबाद मंडळानेही अंदाजे ६०० घरांसाठीच्या सोडतीच्या जाहिरातीसाठीची तयारी सुरू केल्याची माहिती औरंगाबाद मंडळाचे मुख्य अधिकारी मंदार वैद्य यांनी दिली. औरंगाबाद, आंबेजोगाई आणि लातूरमधील घरांचा यात समावेश असल्याचेही त्यांनी सांगितले. एकूणच दसऱ्याच्या मुहूर्तावर इच्छुकांना हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी आहे.
म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार?
नुकतीच म्हाडाच्या मुंबईतील घरांसाठीची सोडत जाहीर करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात हा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी म्हाडाच्या घरांची किंमत कमी झाली पाहिजे, असे मत व्यक्त केले होते. म्हाडाला गृहप्रकल्पांसाठी मोफत जमीन मिळत असल्याने घरांच्या किंमती खासगी विकसकांच्या प्रकल्पाहून कमी असायला हव्यात. राज्य सरकार म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील. तसेच, पुढील घरांच्या सोडतीतील घरांच्या किंमती इतर घरांपेक्षा कमी असतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यामुळे आता म्हाडाकडून त्याची अंमलबजावणी होणार का, हे पाहावे लागेल.