राज्यात बोर, मेळघाट, पेंच, नवेगाव नागझिरा, सह्याद्री आणि ताडोबा-अंधारी असे सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. या सहा व्याघ्रप्रकल्पाच्या क्षेत्रात स्थानिकांच्या सहभागातून वाघांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याला वनविभागाने प्राधान्य दिले आहे. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. ही संख्या ४४४ वर पोहचली आहे. पण यावेळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात व्याघ्र नोंद दिसून आलेली नाही. तेथेच नव्हे तर संपूर्ण पश्चिम घाट वाघांच्या अधिवासाच्या दृष्टीने चिंतेचा प्रदेश ठरला आहे.
अलीकडेच वाघांचे संवर्धन व स्थानांतर या उपक्रमाअंतर्गत ब्रह्मपुरी भूभागातून पहिल्या टप्प्यात दोन मादी वाघिणीचे नवेगाव-नागझिरा वन्यजीव अभयारण्य येथे स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरणाचा हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हा प्रयोग केला जाणार आहे. मागील व्याघ्रगणनेपर्यंत किमान ७ वाघांचे तेथे अस्तित्व दिसत होते. पण आता या प्रयोगाने पुन्हा नव्याने उभारी मिळू शकणार आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रात आहे. सातारा जिल्ह्यात असलेले कोयना अभयारण्य व शेजारच्या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत विस्तारलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान मिळून हा व्याघ्र प्रकल्प निर्माण झाला आहे.
सरकारकडे मागितली परवानगी : वनमंत्री मुनगंटीवार
चंद्रपुरात वाघांची संख्या लक्षणीय वाढल्यामुळे स्थलांतर करण्यात येत आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणींना नागझिरा अभयारण्यात पाठविण्यात आले आहेत, तर पुढे आठ वाघ सह्याद्रीमध्ये सोडण्यासाठी भारत सरकारची परवानगी मागितली असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली येथे बांधण्यात येणाऱ्या पर्यटन गेटच्या कामाचे भूमीपूजन झाले. यावेळी ते बोलत होते. छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू यांनी ताडोबावर आधारीत ३०-३५ मिनिटांची फिल्म तयार करावी, असेही मुनगंटीवार म्हणाले. यावेळी मंचावर अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) प्रवीण चव्हाण, ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर, राजस्थान येथील वन्यजीव बोर्डाचे सदस्य सुनील मेहता, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, हरीष शर्मा, डॉ. मंगेश गुलवाडे, संध्या गुरुनुले, छायाचित्रण दिग्दर्शक नल्ला मुथ्थू उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी, संचालन प्रज्ञा जीवनकर यांनी तर आभार संतोष थिपे यांनी मानले.