अजित पवार-शरद पवार यांच्या पुण्यातील भेटीने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने मुख्यमंत्रिपदाचा शब्द न पाळल्याने अजित पवार पुन्हा माघारी फिरणार की शरद पवार आपली भूमिका बदलून भाजपशी हातमिळवणी करणार, याबाबतच्या वेगवान चर्चा सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना काका पुतण्यांना फैलावर घेतलं. नातीगोती घरात सांभाळायची असतात, बाहेर नव्हे असं सांगताना आपल्या विचारांशी विरोधी भूमिका घेणारा आपला नातलग असू शकत नाही, असंही राऊत म्हणाले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या भूमिकेसंदर्भात आमच्यात चर्चा झाली. संभ्रमाच्या वातावरणाने मविआवर काय परिणाम होऊ शकतो, यावर आमचं बोलणं झालं. राष्ट्रवादीचे नेते सांगत आहेत की- काका पुतणे भेटले तर त्यात वावगं काय, पण मला त्यांना विचारायचंय की कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात रस्त्यावर का लढायचं? उद्या जर आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर किंवा त्यांच्या बेईमान गटाबरोबर चहा प्यायला बसायला लागलो, आम्ही नेत्यांनी त्यांच्याबरोबर बसायचे, नाती गोती व्यवहार सांभाळायचे आणि कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांसाठी, विचारधारेसाठी एकमेकांविरोधात लढायचं, हे काही बरोबर नाही. शिवसेनेच्या विचारामध्ये अशा प्रकारचं ढोंग नाही, असं म्हणत राऊतांनी काका पुतण्याला सुनावलं.
ही लढाई देशाची आणि राज्याची आहे. महाभारताप्रमाणे स्वकीय असो की परकीय, नात्यातला असो की परका… आम्हाला त्याच्यात भेद करता येत नाही. आमच्या विरोधी विचाराच्या हातमिळवणी करणारा आमचा नातेवाईक असू शकत नाही, तुम्ही नातीगोती-व्यवहार सांभाळायचे, मग कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात का लढायचे? असा खडा सवाल काका पुतण्याच्या भेटीनंतर संजय राऊत यांनी विचारला.