• Tue. Nov 26th, 2024

    ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

    ByMH LIVE NEWS

    Aug 11, 2023
    ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’निमित्ताने राज्यात स्वातंत्र्यदिनी १८६ बंद्यांना विशेष माफी

    मुंबई, दि. 11: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्याच्या कारागृहातील विशिष्ट प्रवर्गाच्या बंद्यांना तीन टप्प्यामध्ये विशेष माफी देण्यात येत आहे.  या माफीच्या तिसरा टप्प्यानुसार स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देण्यात येणार आहे.

    माफी योजनेचा उद्देश हा बंद्यांमध्ये कारागृहातील शिस्त व आचरण निश्चित करणे तसेच कारागृहातून प्रोत्साहन स्वरूपात लवकरात लवकर सुटका करणे हा आहे. यामुळे बंद्यांना गुन्हेगारी जीवन सोडून देशाचे जबाबदार नागरिक बनण्याकरीता प्रोत्साहन मिळणार आहे.

    केंद्रीय गृह सचिव, भारत सरकार यांनी 23 एप्रिल 2022 च्या पत्रान्वये प्रस्तुत माफी योजनेची वैशिष्ट्ये आणि माफी योजनेचे निकष विहित केले आहेत. विहित निकषामध्ये बसणाऱ्या राज्यातील बंद्यांची पात्रता तपासण्यासाठी दि. 9 जून 2022 च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (अ.व सु.), गृह विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय तपासणी समिती गठित करण्यात आली आहे.

    या समितीमार्फत शिफारस करण्यात आलेल्या बंद्याच्या प्रस्तावास राज्यपाल यांची मान्यता घेण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी 206,  दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 जानेवारी 2023 रोजी  189 बंद्यांना कारागृहातून मुक्त करण्यात आले आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यामध्ये 15 ऑगस्ट 2023 रोजी 186 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्याबाबतचे आदेश शासनाने निर्गमित केले  आहेत.

    अशा प्रकारे तीन टप्प्यामध्ये एकूण 581 बंद्यांना विशेष माफी देऊन कारागृहातून मुक्त करण्यासंबंधीची कार्यवाही राज्य शासनामार्फत करण्यात आली आहे. त्याबाबत या विभागाच्या 8 ऑगस्ट 2023 रोजीच्या पत्रान्वये गृह मंत्रालय, भारत सरकार यांना कळविण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी मुक्त करण्यात येणाऱ्या बंद्यांमध्ये केंद्र शासनाच्या निर्देशानुसार वयाची 60 वर्ष पूर्ण केलेले पुरूष बंदी, ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 7 बंदी आहेत. तरूण गुन्हेगार 12 ते 21 वर्षे वयात गुन्हा केला, त्यानंतर कोणताही गुन्हा केला नाही व ज्यांनी एकूण शिक्षेच्या 50 टक्के कालावधी पूर्ण केलेले 10 बंदी आहेत. हे बंदी माफी वगळता आहेत. निर्धन व दीन बंदी, ज्यांनी शिक्षेचा कालावधी पूर्ण केला आहे, परंतु दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले 2 बंदी, तसेच ज्यांनी एकूण शिक्षेच्या कालावधीपैकी दोन तृतीयांश अथवा 66 टक्के कालावधी पूर्ण करणारे 167 बंदी आहेत.

    कारागृहनिहाय विशेष माफी मंजूर असलेले बंदी

    येरवडा जि. पुणे खुले जिल्हा कारागृह 1, येरवडा मध्यवर्ती कारागृह 16, नाशिक रोड जि. नाशिक मध्यवर्ती कारागृह 34, ठाणे मध्यवर्ती कारागृह 1, नागपूर मध्यवर्ती कारागृह 23, अमरावती खुले कारागृह 5, अमरावती मध्यवर्ती कारागृह 19, कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह 5, कोल्हापूर खुले 5, जालना 03, पैठण खुले 02, औरंगाबाद खुले 02, औरंगाबाद मध्यवर्ती 24, सिंधुदुर्ग जिल्हा 13, मुंबई मध्यवर्ती 07, तळोजा मध्यवर्ती 08, अकोला 06,  भंडारा 01, चंद्रपूर 02, वर्धा जिल्हा 02, वर्धा खुले 01, वाशिम 01, मोर्शी जि. अमरावती खुले 01, गडचिरोली 04, असे एकूण 186 बंदी.

    ००००

    निलेश तायडे/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed