मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ मे रोजी एसटी स्थानकांबाबतच्या मोहिमेची घोषणा केली. दर दोन महिन्यांनी स्थानकांचे सर्वेक्षण पूर्ण केल्यानंतर त्याचा अहवाल जाहीर करण्यात येणार आहे. मे आणि जून महिन्याचा सर्वेक्षण अहवाल पूर्ण झाला आहे. एसटी मुख्यालय असलेल्या मुंबई सेंट्रल स्थानकातील स्वच्छतेचा दर्जा मध्यम स्वरूपाचा आहे. मुंबई विभागातील उरण स्थानकाला १००पैकी सर्वांत कमी ३८ गुण मिळाले आहेत. परळ स्थानकाला ५१ गुणांवर समाधान मानावे लागले आहे. दादर एसी बसस्थानक (४४), कुर्ला नेहरू नगर (४७) आणि पनवेल (४१ गुण) देण्यात आले आहे.
ठाणे विभागातील वंदना बसस्थानक ६० गुणांसह मध्यम दर्जामध्ये आहे. ठाणे बस स्थानकासह (३७), बोरिवली सुकुरवाडी (४८) आणि नॅन्सी कॉलनी (३३), भिवंडी (३१), कल्याण (३०), डोंबिवली (३२), विठ्ठलवाडी (३८), बदलापूर (२८) मुरबाड (२७), शहापूर (३२) आणि वाडा (४३) या स्थानकांची स्थिती दयनीय आहे, असे एसटीतील स्वच्छ स्थानक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रवाशांना वर्षभर स्वच्छ, सुंदर स्थानकातून प्रवास करता यावा, यासाठी अभियान राबवले जात असून, वाईट दर्जाच्या स्थानकांमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागप्रमुखांना आणि स्थानक प्रमुखांना देण्यात आल्या आहेत, असे एसटीतील अधिकाऱ्यांनी सांगितले.
बीड विभागातील अंबाजोगाई स्थानकाला सर्वाधिक ८३ गुण प्राप्त झाले आहेत. राज्यातील ५६० बस स्थानकांपैकी २९१ स्थानकांना ५०हून कमी गुण मिळाले आहेत. मध्यम स्वरूपातील २४२ स्थानके (५०-७० गुण) आणि २८ स्थानके चांगली आहेत, असे पहिल्या सर्वेक्षणातील अहवालात नमूद करण्यात आले आहे.
असे होते सर्वेक्षण
– स्वच्छतेबाबत बस स्थानक, परिसर, स्वच्छतागृहांसाठी एकूण ५० गुण निश्चित.
– बसस्वच्छता आणि प्रवासी अभियान यासाठी प्रत्येकी २५ गुण.
– शंभर गुणांपैकी सर्वेक्षणात प्रत्येक स्थानकाला गुण देण्यात आले.
– ५०पेक्षा कमी गुणांसाठी वाईट, ५० ते ७०साठी मध्यम आणि ७०पेक्षा अधिक गुणांसाठी चांगले असे वर्गीकरण