• Sun. Sep 22nd, 2024

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाचे भूसंपादनाचे निवाडे १५ सप्टेंबरपासून जाहीर करणार -विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Aug 10, 2023
विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाचे भूसंपादनाचे निवाडे १५ सप्टेंबरपासून जाहीर करणार -विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर  – महासंवाद

नवी मुंबई, दि. 10 :- विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादनाचे निवाडे 15 सप्टेंबरपासून जाहिर करण्याचे आदेश विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर यांनी दिले आहेत.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका प्रकल्पाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांची कार्यशाळा आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे  उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय सहसंचालक राधेश्याम मोपलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकण भवन येथे पार पडली.

या कार्यशाळेत एमएमआरडीचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय यादव, जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे, जिल्हाधिकारी पालघर गोविंद बोडके, जिल्हाधिकारी रायगड डॉ. योगेश म्हसे, उपायुक्त अजित साखरे, उपायुक्त (भूसंपादन) रिता मैत्रेवार, अपर जिल्हाधिकारी हनुमंत आरगुंडे, यांच्यासह भूसंपादन उपजिल्हाधिकारी उपस्थित होते.

विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका  128 कि.मी. लांबीचा असून, यात 16 मार्गिका राहणार आहेत.  या प्रकल्पासाठी जवळपास 1300 हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी 22 हजार 500 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी 17 हजार 500 कोटी रुपये भूसंपादनासाठीचा लाभ देण्यासाठी उपलब्ध आहे. अशी माहिती डॉ. कल्याणकर यांनी यावेळी दिली. भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्याचे  काम विहित वेळेत सर्व यंत्रणांनी करावे, तसेच निवाडे देण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा काटेकोरपणे अवलंब करावा, असे ही यावेळी सांगण्यात आले. भूसंपादन करताना आवश्यक असणाऱ्या विविध विभागांच्या समन्वयाने हे काम करावयाचे आहे. असे ही डॉ. कल्याणकर म्हणाले.

वॉर रुमची स्थापना

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या या महत्त्वकांक्षी प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात कोकण भवन येथे ‘वॉररुम’ सुरु करण्यात येणार आहे.  भूसंपादनाचा मोबदला त्वरेने देण्यासाठी विहित कालावधी निश्चित करण्यात आला आहे.  त्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करण्यात आली असल्याची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली.

संपूर्ण दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत बाजारमूल्य निश्चित करणे, महाराष्ट्र महामार्ग अधिनियम 1955 या कायदेतील भूसंपादन तरतूदी आणि भूसंपादन प्रक्रियेतील विविध बाबींवर सविस्तर सादरीकरण करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed