आपल्या मुलानं ‘सीए’ बनावं हे स्वप्न विशालच्या वडिलांनी पाहिलं होतं. त्यामुळे विशालच्या शिक्षणात कोणताही खंड पडू नये म्हणून त्यांचे कुटुंब लिंबहून साताऱ्यात स्थायिक झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गोडोलीतील विशाल सह्याद्री माध्यमिक विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कला व वाणिज्य कॉलेजमध्ये तर उच्च शिक्षण धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथे पूर्ण केले. त्याला गेम झोनचे व्यसन जडल्याने तो अकरावीलाच नापास झाला. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण त्याला कला शाखेतून घ्यावे लागले.
दरम्यान, शिक्षण घेत असताना वडिलांनी ‘काम करून शिक्षण घे. तुला नवीन अनुभव मिळतील’ अशी इच्छा विशालपुढे व्यक्त केली. विशालने साताऱ्यातील वृत्तपत्र विक्रेते ताजुद्दीन आगा यांच्याकडे पेपर टाकण्याची नोकरी पत्करली. भल्या पहाटे उठणे, घरोघरी जाऊन पेपर टाकणे, दिवसभर अभ्यास करणे असा त्याचा दिनक्रम आहे.
मिळणाऱ्या पैशातून पुस्तकांचा खर्च निघू लागला. बारावीनंतरचे शिक्षण वाणिज्य शाखेतून घेताना विशालने ‘सीए’ परीक्षेची तयारी सुरू केली. अभ्यास करूनही यश सातत्याने हुलकावणी देत होते. अखेर तो दिवस आला अन् विशालने २०२३ मध्ये ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने घेण्यात आलेली परीक्षा उत्तीर्ण होत यशाला गवसणी घातली. विशाल ‘सीए’ झाला असून, त्याने आपल्यासाठी राबणाऱ्या आई – वडिलांचे स्वप्न त्याने जिद्दीने पूर्ण केले. विशाल यांना सत्यजित भोसले व ओंकार तिखे यांचे मार्गदर्शन लाभले.
घरोघरी वृत्तपत्र टाकण्याचे काम सात वर्षे केले. हे काम मला कितीतरी अनुभव देऊन गेले. माझ्या या यशात कुटुंबीय व मार्गदर्शकांचे योगदान मोलाचे आहे. अपयशाने खचून न जाता तरुणांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करावा. यशाला कोणताही शॉर्टकट नाही. यश मिळविण्यासाठी तुम्हाला कठोर मेहनत घ्यावीच लागते. शिवाय अभ्यासालाही वेळ द्यावा लागतो, असे विशाल जगताप यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले.