मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या घटनेमुळं लोकल सेवेला उशीर झाला. स्थानिक प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेला खोपोली ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या जलद लोकलमध्ये प्रवेश मिळाला नव्हता. ही ट्रेन ६.५४ मिनिटांनी दिवा स्थानकात पोहोचली होती. त्या महिलेनं मोटरमनला लोकलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. मोटरमनला वेळापत्रकाचं पालन करायचं असल्यानं लोकल सुरु करताच संबंधित महिलेनं मोटरमनच्या केबिनमध्ये प्रवेश केला आणि लोकल थांबवण्यास प्रवृत्त केलं.
या अचानक घडलेल्या घटनेमुळं मोटरमननं ब्रेकचा वापर करत लोकल थांबवली. संबंधित महिलेला केबिनमधून खाली उतरण्यास सांगितलं. मात्र, तिने नकार देताच मोटरमननं दिवा स्थानकातील अधिकारी आणि आरपीएफला माहिती दिली. त्यानंतर त्या महिलेला महिलांच्या डब्यात कसा बसा प्रवेश मिळाला. त्यानंतर ७. ०५ मिनिटांनी दिव्याहून लोकल सुटली.
दिवा स्थानकातील आरपीएफच्या पथकानं त्या प्रवासी महिलेवर कुर्ला स्थानकापर्यंत लक्ष ठेवलं. कुर्ला स्थानकात संबधित महिला प्रवासी महिलेला ताब्यात घेण्यासाठी आरपीएएफच्या महिला कर्मचारी उपस्थित होत्या. त्यानंतर त्या महिलेला ताब्यत घेत दिवा येथे आणण्यात आलं. तिच्यावर भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती दिवा आरपीएफचे पोलीस निरीक्षक गिरीश तिवारी यांनी दिली. तिवारी यांनी प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य करावं, असं आवाहन केलं आहे.
खोपोली, कर्जत, कल्याण हून पुरेशा प्रमाणात लोकल ट्रेन मुंबईकडे जाण्यासाठी उपलब्ध नसल्यानं अशा घटना घडत असल्याचं काही प्रवाशाचं म्हणनं आहे. शिवसेना पदाधिकारी आणि रेले प्रवासी कार्यकर्ते आदेश भगत यांनी रेल्वेकडे वेळोवेळी दिवा स्थानकातून लोकल सेवा सुरु करा, अशी मागणी केल्याचं म्हटलं. कल्याण आणि डोंबिवलीमधून ट्रेन मध्ये प्रवासी असतात त्यामुळं दिवा येथील प्रवाशांना लोकलमध्ये बसण्यास संधी मिळत नाही. दिवा येथून लोकल सेवा सुरु झाल्यास मुंब्रा आणि कळवा येथील प्रवाशांना फायदा होईल, असंही ते म्हणाले.