नागपूरच्या भाजप कार्यकर्त्या सना खान (४०) या १ ऑगस्टपासून बेपत्ता होत्या. काही कामानिमित्त त्या मध्य प्रदेशातील जबलपूरला गेल्या होत्या. सना खान यांचा फोनही बंद असल्याचे कळते. याप्रकरणी शहरातील मानकापूर पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सना खान यांची जबलपूर येथील एका व्यक्तीसोबत व्यावसायिक भागीदारी होती. सना खान यांच्या शोधासाठी नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरमध्ये दाखल झाले असले तरी संबंधित व्यक्ती फरार असल्याचे वृत्त आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सना खान यांचा जबलपूरमध्ये पप्पू उर्फ अमित साहू नावाचा व्यावसायिक भागीदार आहे. तो या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. सना खान त्यांना भेटण्यासाठी जबलपूरला गेली होती आणि दुसऱ्या दिवसापासून बेपत्ता झाली.
नागपूर पोलिसांचे पथक जबलपूरला गेल्यानंतर अमित ऊर्फ पप्पू साहू फरार झाला. त्यांनी ढाब्याला कुलूप लावले होते. नोकरही तेथून पळून गेला. अखेर पोलिसांनी अमितचा नोकर जितेंद्र गौर याला अटक केली.त्याने पोलिसांना सांगितले की २ ऑगस्ट रोजी त्याने साहूच्या कारची रक्ताने माखलेले डिक्की धुतली होती. साहूने सना खान यांची घरातच हत्या केली. त्यानंतर सना खान यांचा मृतदेह डिक्की मध्ये ठेवून जबलपूर-दमुआ-कटंगी रस्त्यावरील ढाब्यापासून काही अंतरावर असलेल्या हिरण नदीत फेकून देण्यात आला होता. २ ऑगस्ट रोजी सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. नद्यांनाही पूर आला होता.
पोलिसांनी नदीत सना खान यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला आहे. सना खान खून प्रकरण जबलपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले असून आरोपी जितेंद्र गौरला जबलपूर पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पप्पू साहू आणि त्याचा भावाचा शोध जबलपूर पोलीस करत आहेत.