मेहुणीने सराफाला त्याची पत्नी, सासू आणि एका अनोळखी व्यक्तीचे ऑडिओ रेकॉर्डिंग देखील पाठवले होते. यामध्ये त्याला जीवे ठार मारण्याची चर्चा झाली होती. त्यानंतर सराफाने स्वतःचे जेवण स्वतःच तयार करण्यास सुरुवात केली. काही दिवस त्याच्या पत्नीने त्याला स्वयंपाक करु देत नसे. कोव्हिडच्या काळात त्याला उपाशी राहावे लागले, कारण तो रेस्टॉरंटमधून जेवण मागवू शकत नव्हता.
त्यानंतर तो दादरमध्ये भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला गेला. २०२० मध्ये त्याच्या संपूर्ण शरीरात संसर्ग होऊ लागला. मुंबई उपनगरातील एका खासगी रुग्णालयात त्याने उपचार घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.
“मी बर्याचदा आजारी पडायचो. अँटीबायोटिक्स घेतल्यावर मी बरा झालो, पण मी ते घेणं बंद केलं, तेव्हा पुन्हा संसर्ग झाला. डॉक्टरांनी सांगितले की माझ्या रक्तातील पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या आहेत. मी इतर तीन ते चार डॉक्टरांना भेट दिली. प्रत्येक डॉक्टरचं हेच म्हणणं आहे की मला संसर्ग झाला” असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. सराफ व्यापाऱ्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, ८ डिसेंबर २०२२ रोजी बँकेच्या अधिकाऱ्यांनी फोन करून त्यांना माहिती दिली, की त्यांच्या पत्नीने जॉईंट लॉकरचे भाडे थकवले आहे. त्यांना ते रिकामे करण्यास सांगितले. त्यांनी बँकेला भेट दिली असता आपल्या मुलीच्या लग्नासाठी जपून ठेवलेले दागिने लॉकरमधून गायब असल्याचे आढळून आले.