महंमद युनूस महंमद याकू साकी (वय २४), महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा), अब्दुल कादिर दस्तगीर पठाण (वय ३२, कोंढवा) आणि सिमाब नसरुद्दीन काझी (वय २७ रा. रत्नागिरी) अशी ‘एटीएस’ने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कोथरूड परिसरात दुचाकी चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या साकी आणि खान यांना कोथरूड पोलिसांनी १८ जुलै रोजी अटक केली होती. जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणी ते फरारी असून, ‘एनआयए’ने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तपासात मिळाली. त्यानंतर या प्रकरणात ‘एटीएस’ने तपास करून पठाण याला साकी आणि खान यांना राहायला खोली व काम दिल्याच्या आरोपावरून अटक केली; तसेच पैसे पुरविल्याच्या आरोपावरून काझीला अटक केली.
दरम्यान, ‘आयएस’च्या महाराष्ट्र ‘मॉड्यूल’प्रकरणी डॉ. अदनान अली सरकार याला अटक केल्यानंतर ‘एटीएस’ने अटक केलेल्या दहशतवाद्यांशी त्याचा संबंध असल्याची माहिती मिळाली. दहशतवादी कारवायांमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या या ‘मॉड्यूल’प्रकरणी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक करण्यात आली होती. बडोदावाला याने साकी आणि खान यांना पुण्यात आणून त्यांच्यामार्फत काही तरुणांसाठी बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. बडोदावाला याच्या सांगण्यावरून पठाण याने साकी आणि खान यांना कोंढव्यात राहण्यासाठी खोली मिळवून दिली होती. साकी आणि खान हे दोघे मूळचे मध्य प्रदेशातील रतलाम येथील रहिवासी असून, दीड वर्षापासून ते पुण्यात वास्तव्यास होते.
देशभर कारवायांचा कट
‘एटीएस’ने अटक केलेले चार आरोपी आणि आणि ‘एनआयए’ने अटक केलेले पाच आरोपी यांचे परस्पर संबंध उघडकीस आल्याने ‘एटीएस’ने त्यांच्यावर कारवाई करून कोंढव्यातील ‘महाराष्ट्र मॉड्यूल’ उद्ध्वस्त केले. या दहशतवाद्यांनी पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील जंगलात बॉम्बस्फोट घडवले होते. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून दहशतवाद्यांनी पुण्यासह देशभरात घातपाती कारवाया करण्याचा कट रचला होता.