मिळालेल्या माहितीनुसार, किरकोळ कारणातून पती-पत्नीमध्ये वाद झाला. या वादातून पत्नीने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन जीव दिला. पारनेर तालुयातील पळशी येथील नागापूरवाडी येथे आईसह दोन चिमुरड्यांचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळले. याबाबतची माहिती लालू कोळेकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली. दुपारी २.४५ च्या दरम्यान माका नामदेव बिचकुले या शेतकर्याच्या विहिरीत लहान मुलीचे प्रेत पाण्यावर तरंगताना लालु कोळेकर (रा. पळशी) आणि गावकर्यांनी पाहिले. याची माहिती कोळेकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलीस स्टेशनला दिली. घटना समजताच पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विजय ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र जावळे, आपल्या पथका सह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
यावेळी पळशीचे सरपंच यांनी ग्रामस्थांच्या मदतीने कांचन सोमा बिचकुले (५) हिचा मृतदेह बाहेर काढला. तो काढत असताना तिची आई बायडाबाई सोमा बिचकुले (२६) हिचाही मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. मात्र मुलगा समाधान सोमा बिचकुले (२) याचा मृतदेह मिळून आला नाही. ग्रामस्थ आणि पोलिसांनी अथक परिश्रम घेत आई बायडाबाई आणि मुलगी कांचन बिचकुले यांचे मृतदेह बाजेला बांधून, दोरांच्या सहाय्याने विहिरीच्या पाण्याबाहेर काढले. नंतर लहान मुलगा समाधान याचा मृतदेह विहिरीत सापडला. टाकळी ढोकश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. घटनेचे ठोस कारण समजले नाही. प्रथमदर्शनी आईने दोन मुलांसह आत्महत्या केली असावी, असे सांगण्यात आले. पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शैलेंद्र जावळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रितम मोढवे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र साठे, पोलीस कॉन्स्टेबल विवेक दळवी करत आहेत.