जसापूर येथील युवा शेतकरी प्रदीपराव बंड (वय ४५ वर्षे) यांनी या वर्षी दोन एकरात टोमॅटोची लागवड केली आहे. टोमॅटोचे पीक घेत असताना जुलै महिन्यात टोमॅटो बियाणे आणून रोपे तयार करून शेतात झिकझॅक पद्धतीने मल्चिंग टाकून लागवड केली होती. ५ फूट बाय २ फूट बेड अशा पद्धतीने साधारणत: दीड फूट अंतरावर दोन रोपांची लागवड केली. तसेच ठिबक सिंचन पद्धतीने पाण्याचे व खताचे नियोजन केले. ५० टक्के रासायनिक व ५० टक्के सेंद्रिय पद्धतीची औषधे त्यांनी वापरली. सहा वेळा जीवामृत झाडांना दिले.
या दोन एकरात बंड यांना आजच्या भावाने लाखो रुपयांचे उत्पादन घेऊन लाल सोने असलेल्या टोमॅटोचे उत्पादन घेऊन चांदूरबाजार तालुक्यातील जसापूर येथील प्रदीप बंड हे उत्कृष्ट शेतकरी ठरले आहेत. चांदूर बाजार, अमरावती परतवाडा, या बाजारपेठेमध्ये या टोमॅटोला मोठ्या प्रमाणात मागणी सुरू असून ६५० ते १५०० रूपये प्रति कॅरेट दर भाव असल्याने जसापूर येथील शेतकरी बंड सध्याच्या परिस्थितीमध्ये मालामाल झालेले पाहायला मिळत आहे.
दिवस रात्र मेहनतीच्या जोरावर उत्पादन घेतलेला शेतकरी पाहायला मिळू शकेल, मात्र माझ्या मालाला ५०० रु भाव जरी मिळाला तरी सुद्धा मला या टोमॅटोमध्ये समाधान आहे. असे भाव जर शेतकऱ्यांना मिळाले तर कुठल्याही शेतकरी आत्महत्या किंवा कर्जबाजारी होणार नाही असे मत शेतकरी प्रदीप बंड यांनी व्यक्त केले आहे. बी-बियाणांपासून तर मजुरी, फवारणी, खत, टोमॅटोची झाडे बांधणे, फळे सोडणे, निंदण यासाठी दोन एकरात त्यांचा सरासरी दोन लक्ष रूपये खर्च झाला आहे. खर्च वजा करून असे भाव जर राहिले तर आपल्याला लाखो रुपये मिळतील असे ते म्हणाले.
राज्यासह संपूर्ण देशभर टोमॅटोचे दर वाढलेले आहेत. राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होतोय आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये नाफेडतर्फे टोमॅटो खरेदीचे आदेश काढले आहेत. अवकाळी पावसामुळं उन्हाळ्यात टोमॅटो उत्पादकांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. आता या दरवाढीमुळं महाराष्ट्रातील काही शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. हे उत्पादन घेत असताना त्यामधील शेतकरी प्रदीप बंड यांची जिद्द व मेहनत या भरोशावर उत्पादन घेण्याची क्षमता आज उत्कृष्ट शेतकरी म्हणून पाहायला मिळत आहे.