राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद, ब्रिटिश कौन्सिल, आयसीएमआर आणि रामण विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘लस-आशेचा किरण’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. रामण विज्ञान केंद्रात शनिवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ३१ डिसेंबरपर्यंत शहरातील नागरिक या प्रदर्शनात लशीची कथा अनुभवू शकतात. विदर्भातील कानाकोपऱ्यात पोहोचण्याकरिता विशेष मोबाइल व्हॅनदेखील तयार करण्यात आली आहे. विदर्भातील शाळा, महाविद्यालयांमध्ये ही व्हॅन भ्रमण करून माहिती देईल. देशभरातील पाच शहरांमध्ये विविध चरणांत हे प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यापूर्वी दिल्लीमध्ये या प्रदर्शनाचे आयोजन झाले होते. नागपूरनंतर मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये प्रदर्शन भरविले जाईल.
प्लेगच्या वेळी होता ‘मसाला मास्क’
करोनाकाळात ‘मास्क’ हा शब्द सर्वांच्या कानी पडला. मात्र, त्यापूर्वी आलेल्या महामारीत विविध प्रकारचे मास्क वापरण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक लक्षणीय होता प्लेग काळातील भारतीय मसाल्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला मसाला मास्क. सतराव्या शतकात युरोपमधील प्लेगवर उपचार करणारे डॉक्टर काळा लांब कोट, चामड्याचे हातमोजे आणि दालचिनी, काळेमिरी, लवंग, हळद आणि आले यांच्या भुकटीने भरलेल्या मास्कचा वापर करायचे. हा मास्क या प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे.
एकत्रित आल्यास कुठलेही युद्ध जिंकणे शक्य!
‘करोना विषाणूसोबत लढा देताना भारत जगातील सर्वात यशस्वी देश ठरला आहे. लशीच्या संशोधनापासून ते देशातील कानाकोपऱ्यात वितरित करण्याची कथा खूप सुंदर आहे. भारतातील नागरिकांनी एकत्रितपणे लढा दिल्यास कुठलेही युद्ध जिंकणे शक्य आहे; याचे जिवंत उदाहरण करोनाचा लढा आहे’, असे मत नीरीचे संचालक डॉ. अतुल वैद्य यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी लशीच्या इतिहासावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे महासंचालक ए. डी. चौधरी, सूत्रसंचालन रामण विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक अर्नब चॅटर्जी यांनी केले. आभार उपमहासंचालक समरेंद्र कुमार यांनी मानले.